सुटता सुटेना; नवीन वर्षातही नवाब मलिक तुरुंगातच राहणार

NCP leader Nawab Malik’s son Faraz booked in cheating case over use of fake documents in visa plea

मुंबई – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अटकेत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांना पुढील वर्षांतही तुरुंगातच राहावं लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास उच्च न्यायालायने नकार दिला आहे. सहा जानेवारीपर्यंत त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार नाही, असं उच्च न्यायालायने स्पष्ट केलं आहे. तसंच, नवाब यांचा आरोग्याचा अहवाल येत्या दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले आहेत.

हेही वाचा – मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना धक्का: कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

नवाब मलिक यांनी सोमवारी, १२ डिसेंबर रोजी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. वकिल तारक सैय्यद आणि कुशल मोर यांच्यामार्फत मलिक यांनी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याप्रकरणी मंगळवारी म्हणजेच आज सुनावणीची तारीख दिली होती. मात्र, या प्रकरणावर तत्काळ सुनावणी करता येणार नसल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. तसंच, सहा जानेवारी २०२३ पर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. याआधी ३० नोव्हेंबर रोजी विशेष न्यायालायने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. ईडीने २३ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता त्यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केली. तेव्हापासून ते कोठडीतच आहेत. त्यामुळे त्यांनी जामीन अर्ज केला होता. मात्र, यावर आता पुढच्या वर्षांतच सुनावणी होणार असल्याने नवीन वर्षांची सुरुवात त्यांना तुरुंगातच काढावी लागणार आहे.