Homeमहाराष्ट्रHindutva : हा जनतेवर उगवला जाणारा सूडच आहे, चित्रा वाघांची उद्धव ठाकरेंवर...

Hindutva : हा जनतेवर उगवला जाणारा सूडच आहे, चित्रा वाघांची उद्धव ठाकरेंवर टीका

Subscribe

वक्फ बोर्डाला विरोध करायच म्हटले तर मूग गिळून गप्प राहिले आणि जेव्हा जनता त्यांच्याविरोधात कौल देते तेव्हा जनतेचा कौल अमान्य करायचा, ही उद्धव ठाकरे यांची जुनी खोड आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

(Hindutva) मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल, गुरुवारी शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे मुंबईत झाले. यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर तर, शिवसेना शिंदे गटाचा मेळावा बीकेसी येथे पार पडला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्या भाजपाने आम्हाल हिंदूत्व शिकवू नये. मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कडवट हिंदू म्हणून लढायला तयार आहोत. बुरसटलेले गोमुत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावले. यावरून भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

आमदार चित्रा वाघ यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आता अचानक हिंदुत्व आठवले. ते पाहिजे तेव्हा हिंदुत्वाचा मुखवटा लावतात आणि एरवी तो खुंटीवर टांगवून ठेवतात, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहेत.

हेही वाचा – Waqf Bill JPC Meeting : वक्फ बोर्डाच्या JPC च्या बैठकीत गोंधळ, अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित

  • तुष्टीकरण करत उलेमा बोर्डाच्या 17 मागण्या मान्य करताना कुठे गेले होते हिंदुत्व?
  • पाकिस्तानी झेंडे डोळ्यासमोर नाचवले गेले, तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्व?
  • व्होट जिहाद करण्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर मशीद उभारण्यापर्यंत घोषणा करताना कुठे गेले होते हिंदुत्व?

वक्फ बोर्डाला विरोध करायच म्हटले तर मूग गिळून गप्प राहिले आणि जेव्हा जनता त्यांच्याविरोधात कौल देते तेव्हा जनतेचा कौल अमान्य करायचा, ही उद्धव ठाकरे यांची जुनी खोड आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. आता उद्धव ठाकरे यांना सूड घ्यायचा आहे. पण ते कोणाचा सूड घेणार आहेत? जनतेचा? त्यांनी वारंवार गद्दार, खंजीर यासारखी भाषणे करत तसेच रोज सकाळी माध्यमांवर आपल्या भोंग्याला (खासदार संजय राऊत) सोडणे हा जनतेवर उगवला जाणारा सूडच आहे, असा पलटवारही त्यांनी केला आहे. (Hindutva: Chitra Wagh criticizes Uddhav Thackeray)

हेही वाचा – Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अमित शहांसोबत मांडीला मांडी लावून बसले, दोघांमध्ये काय चर्चा झाली?