हिंगणघाट पीडितेची झुंज अपयशी; प्राध्यापिकेचा मृत्यू

हिंगणघाट जळीतकांडातील मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडितेचा आज सकाळी मृत्यू झाला आहे.

hinganghat burn case victim's death
हिंगणघाट पीडिता

हिंगणघाट जळीतकांडातील मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडितेची अखेर झुंज अपयशी ठरली आहे. आज, सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्यावर उपचार करणार्‍या ऑरेंज सिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेली पीडितीची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. दोन दिवसांपासून पीडितीचा रक्तदाब कमी – जास्त होत असल्यामुळे तिची प्रकृती खालावली होती. त्यामुळे या पीडितीला गेल्या दोन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, हृदय, यकृत, मृत्रपिंड असे सर्वच अवयव निकामी झाल्याने या पीडितीचा अखेर आज मृत्यू झाला.

डॉक्टरांच्या प्रयत्नाला अपयश

गेल्या सात दिवसांपासून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, डॉक्टरांना देखील तिला वाचवण्यात यश आलेले नाही. दरम्यान, शनिवारी या पीडितेवर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. डॉक्टरांचे विशेष पथक देखील दाखल झाले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नाला यश मात्र आले नाही.

आरोपीला आमच्याकडे स्वाधीन करा

मुलीच्या मारेकराला आमच्याकडे स्वाधीन करा. आम्हाला निर्भया सारख नको, लवकरात लवकर न्याय हवा आहे. जो त्रास माझ्या मुलीला झाला आहे, तो त्रास आरोपीला झाला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितीच्या वडिलांनी दिली आहे.

पीडितीचा मृत्यू नाही तर हत्या

हा पीडितीचा मृत्यू नसून ही तिची हत्या करण्यात आली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून अशाप्रसंगी पीडितीच्या नातेवाईकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

काय घडल होत

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे यांने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे याने तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरूणीने आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते.


हेही वाचा – सलाईन, इंजेक्शन पाहिजे.. द्या पैसे!