फडणवीसांनी दुय्यम पद स्वीकारले हे त्यांचा चेहराच सांगत होता – शरद पवार

Sharad pawar on Shinde and Fadnavis  Government

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुय्यम पद आनंदाने स्वीकारले असे दिसत नाही. हे त्यांचा चेहराच सांगत होता, पण ते नाखूश आहेत. त्यांनी नागपूरमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. आदेश आल्यावर तो पाळायचा असतो, असे संस्कार त्यांच्यावर झाले असावेत. बाकी काही कारण असू शकत नाही, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ गुरुवारी सायंकाळी घेतली. यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे गटाने पाठिंबा दिल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे मलाही वाटले होते. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले गेले हा माझ्यासाठीही अनपेक्षित धक्का आहे, पण त्याचबरोबर त्यांनी हे पद घेतले यात नवल वाटले नाही. शिवसेनेचे बंडखोर आमदार आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले. राज्याचे नेतृत्व बदलण्याची त्यांची इच्छा असावी. तसेच फडणवीस यांची अपेक्षा ही उपमुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक होती, पण भाजपमध्ये एकदा आदेश आला की त्याच्यामध्ये तडजोड नसते.

हा आदेश आला आणि त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदे यांच्यावर आली. याची कल्पना कोणालाही नव्हती. कदाचित शिंदे यांनाही नव्हती. या कार्यपद्धतीमध्ये आदेश एकदा दिल्यानंतर तो तंतोतंत पाळावा लागतो. त्याचे उदाहरण म्हणजे जे ५ वर्षे मुख्यमंत्री होते, नंतर ज्यांनी विरोधी पक्षाचे नेतृत्व केले त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. पक्षाचा एकदा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते याचे उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिले, असे शरद पवार यांनी सांगितले.

बंडखोरीला आवर घालण्यात सरकार अपयशी ठरले का, या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी बंड थोपवण्यासाठी चर्चा केली, मात्र एकाच वेळी ३८ आमदार राज्याबाहेर जातात ही काही साधी बाब नाही. त्यांची मते काही वेगळी असतात, तर दुरुस्ती करण्यात काही संधी उरत नाही. हे आमदार बाहेर नेण्याची कुवत शिंदे यांनी दाखवली यातच त्यांचे यश आहे. या योजनेची तयारी आधीच होती असे ऐकण्यात येत आहे. राज्यातून सुरत, सुरतहून आसाम अशी योजना एका दिवसात होत नाही. गुवाहाटीत हॉटेलभोवती कडेकोट पहारा होता. आमचे काही सहकारी तेथे बसून होते, पण त्यांना बंडखोर आमदारांशी संपर्क साधता आला नाही. त्यामुळे त्यांच्याची चर्चा करता आली नाही.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत होते, या आरोपाला कसे उत्तर द्याल, यावर बोलताना त्याचा काही संबंध नाही. त्यांच्याकडे सध्या बहुमत आहे. हे लक्षात आले तर जास्त कटीकटी करू नये. बहुमत गेले हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे सत्तेला चिकटून राहिले नाहीत. माझ्या दृष्टीने ते चांगले आहे. १९८०मध्ये माझ्या नेतृत्वात ७९ आमदार निवडून आले. निवडणूक झाल्यावर मी भारताच्या बाहेर सुट्टीला गेलो. परत आल्यानंतर माझ्यासह फक्त ६ लोक शिल्लक राहिले. मी विरोधी पक्षाचा नेता होतो. माझे पदही गेले, पण नंतर निवडणूक झाली आणि जे मला सोडून गेले त्यांचा जवळपास सगळ्यांचा पराभव झाला, अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.