घरमहाराष्ट्रराजकारणातील ऐतिहासिक निर्णय! कम्युनिस्ट पक्षाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा

राजकारणातील ऐतिहासिक निर्णय! कम्युनिस्ट पक्षाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा

Subscribe

मुंबई : एकेकाळी मुंबईच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्षाने बुधवारी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय मैत्रीचे पर्व सुरु केले. कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत लढू. भाजपविरोधातील लढाईतही तुमच्या साथीला असू, अशी ग्वाही कम्युनिस्ट नेत्यांनी ठाकरे यांना दिली.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने याधीच शिवसेना उमेदवाराला पाठींबा दिला आहे. ही पोटनिवडणूक महाविकास म्हणून लढवली जात असताना आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी पोटनिवडणुकीत शिवसेनेला समर्थन दिले आहे. त्यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे.

- Advertisement -

१९७० च्या दशकात कम्युनिस्ट पक्षाचे कामगार संघटनेतील वर्चस्व कमी करण्यासाठी शिवसेनेने संघर्ष केला. या संघर्षातून कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या झाली. या हत्येत शिवसेनेचा हात असल्याचा आरोप झाला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जाहीर सभांमधून कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचा उल्लेख ‘लाल माकडं’ असा करत होते. शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्षातून विस्तव जात नसताना आज हे दोन पक्ष पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
माकपचे सचिव कॉम्रेड मिलिंद रानडे, ज्येष्ठ नेते कॉ. प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी आणि बबली रावत यांनी आज दुपारी अडीच वाजता उद्धव ठाकरे यांची भेट पाठींबा दिला. यावेळी शिवसेना नेते अनिल परब, रवींद्र वायकर, अरविंद सावंत, सुनील प्रभू, रमेश कोरगावकर आदी उपस्थित होते.

भाजप देशातील लोकशाही संपवून हुकुमशाही आणू पाहत आहे. तसेच छोट्या आणि प्रादेशिक पक्षांना नेस्तनाबूत करून एकपक्षीय राजवट आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपने राज्यात केंद्रीय संस्था आणि पैशांच्या मदतीने सूडबुद्धीने सरकार पाडले. त्यामुळे भाजपचा पाडाव करण्यासाठी आम्ही अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे , असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.


आनंद महिंद्रांनी व्हिडीओ ट्विट करत विचारला प्रश्न, बरोबर उत्तर देणाऱ्याला मिळणार ट्रॅक्टर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -