विरार : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास उरले असताना सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींचा वेग वाढला आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांना संपर्क केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. अशावेळी जो माझ्या तालुक्याच्या भविष्याचा विचार करेल त्यांच्यासोबत आम्ही असू, अशी भूमिका हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केली आहे. (Hitendra Thakur position on supporting Mahayuti or Mahavikas Aghadi is clear)
विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या, शनिवारी (23 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजल्यापासून जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र निकालानंतर कोणाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला पेव फुटल्याचे पहायला मिळणार आहे. मात्र कोणाची सत्ता येईल आणि कोण सत्तेच्या बाहेर पडेल हे उद्याच ठरेल.
हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितल्या ‘मविआ’च्या किती जागा येणार? NCP च्या उमेदवारांना म्हणाले, जोपर्यंत…
निकालाच्या बारा तास अगोदरच महाविकास आघाडी आणि महायुती सरकारकडून पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पाहिले जाणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना सत्तेत येण्यासाठी विनवणी केली जात असल्याचे फोन येऊ लागले आहेत, अशी माहिती विश्वासनीय सुत्रांनी दिली आहे. याचपार्श्वभूमीवर त्यांना याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
माझ्या तालुक्याचा विचार करेल त्याला साथ देणार
दरम्यान, हितेंद्र ठाकूर म्हणाले की, माझे सर्वच राजकारणातील नेते मंडळी हे मित्र आहेत. मला पहिली आघाडी, दुसरी आघाडी, तिसरी आघाडीच्या नेत्यांचे फोन आले आहेत. परंतु आम्हाला योग्य तो मान सन्मान द्यावाच लागेल आणि आम्ही योग्य तो मान सन्मान आमच्या विभागाकर्ता तसेच मतदारसंघाकर्ता मागून घेऊ. त्यामुळे जो माझ्या तालुक्याचा विचार करेल त्यांच्यासोबत आम्ही असू. मी माझ्या आयुष्यात स्वत:साठी कधी काहीच मागितले नाही, अशी माहितीही हितेंद्र ठाकूर यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.
हेही वाचा – Election 2024 : निकालाआधीच राष्ट्रपती राजवटीची चर्चा; घटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट म्हणतात…