amravati violence: अमरावतीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न, विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा – वळसे-पाटील

HM dilip Walse patil reaction on parambir singh raza akademi amravati riot
परमबीर सिंह, अमरावती दंगलीवर गृहमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

अमरावतीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करण्यात येत आहे. अमरावतीमध्ये आंदोलनाला परवानगी नव्हती परंतु काही लोकं निवेदन देण्यासाठी गेले होते. तेव्हा जमावाकडून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली त्यामुळे हिंसा भडकली. जमावाकडून दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच अमरावतीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस आवश्यक पावलं उचलत आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना अमरावतीमधील हिंसेबाबत माहिती दिली आहे. अमरावतीमधील घटने संदर्भात आढावा घेतला असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले, शुक्रवारी जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात काही संघटनांनी निवेदन देण्यासाठी परवानगी मागितली होती. निवेदन देण्यासाठी जात असताना त्यावेळी काही लोकांनी दगडफेक करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मिळाली असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान शनिवारी भाजपने अमरावतीमध्ये बंदची हाक दिली होती. हा बंद शांततेत होईल अशी अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने काही अप्रिय घटना घडल्या आहेत. यामध्ये दगडफेक आणि नुकसान करण्याचा प्रयत्न होत असताना दिसत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व प्रयत्न होत आहेत. राज्य सरकार राज्याचे पोलीस विभाग आवश्यक पावलं उचलत आहेत. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी बोलणं झाले असून त्यांना विनंती केली आहे. आपले राज्य महत्त्वाचे आहे त्यामुळे सगळ्यांनी मदत करा आणि शांततेसाठी प्रयत्न करा असे आवाहन केलं असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

समाजात भडकाऊ वक्तव्य करणे योग्य नाही. अशा प्रकारे कोणी समाजात विद्वेश निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. राज्यातील हिंदू, मुस्लिम, सर्व लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी अमरावतीमध्ये शांतता राखण्यासाठी मदत केली पाहिजे. हे सर्वच जण मदत करतील असा विश्वास देखील वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे पार्श्वभूमी

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी घडलेल्या घटनांबाबत माहिती दिली आहे. रजा अकादमीच्या माध्यमातून आंदोलन जाहीर करण्यात आले होते. परंतु त्यामध्ये कोणत्या संघटना सामील झाल्या होत्या याबाबत अधिकृत माहिती आली नाही. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे निवेदन देण्यासाठी काही घटक गेले होते. त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली असल्यामुळे हा रोष निर्माण झाला आहे. मात्र राज्यातील परिस्थिती आटोक्यात आहे. अमरावतीमध्ये लवकरच शांतता प्रस्थापित करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  Amravati violence: भाजपच्या अमरावती बंदला हिंसक वळण, दुकाने, वाहनांची तोडफोड