Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Holi 2021: कोकणात 'अशी' साजरी केली जाते होळी

Holi 2021: कोकणात ‘अशी’ साजरी केली जाते होळी

Related Story

- Advertisement -

होळी म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य… मुक्त रंगांची उधळण. महाराष्ट्रात सर्वत्र होळी साजरी केली जाते पण कोकणातील होळीचे वैशिष्ट्य, उत्साह, परंपरा काही औरचं.! कोकणात वर्षोनोवर्षे चालत आलेला होळी हा सण पारंपारिक संस्कृती आणि प्रामाणिक श्रद्धेने आजही साजरा केला जातो. कोकणात होळी या सणाला शिमगा असे म्हणतात. त्यामुळे शिमगा म्हणजे कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय. त्यामुळे गणेशोत्सवानंतर कोकणी माणूस कोणत्या सणाची वाट पाहत असले तर तो म्हणजे शिमगा. शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईत किंवा इतर राज्यात राहत असलेल्या कोकणी माणसाला गावी जाण्यासाठी विलक्षण ओढ लागलेली असते. त्यामुळे मुंबईत राहिलेला चाकरमाणी दोन दिवसाची सुट्टी काढून का होईना शिमग्याला गावी जातोच. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात ज्याप्रमाणे हा सण प्रचंड उत्साहाने साजरा केला जातो. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत नाही.

Holi 2021 how to celebrate holi in konkan raigad sindhudurga, ratnagiri
Holi 2021: कोकणात ‘अशी’ साजरी केली जाते होळी

- Advertisement -

हिवाळा ऋतू संपता संपता उन्हाळ्याची देणारा सण म्हणून होळी अर्थात शिमगोत्सव रत्नागिरीत अतिशय उत्साहात साजरा होतो. समाजातील वाईट गोष्टी अग्निदेवतेच्या स्वाधीन करत जाळून त्यांचे निर्दालन करणे हा होळी सणा मागचा मूळ उद्देश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक गावाची होळी साजरी करण्याची अनोखी, पद्धत आहे. सर्वसाधारण आठ ते १५ दिवस हा शिमगोत्सव सर्वत्र साजरा होतो.

शिमगा साजरा करण्यामागचा हेतू

होळी अर्थात शिमगोत्सव सण फाल्गुन महिन्यात येतो. या काळात कोकणातील शेतकरी बांधवांकडे निवांत वेळ असतो. कारण शेतीची बहुतांश कामे झालेली असतात. यादरम्यान शेतकरी शेतीची भाजवळ करत पुढच्या पेरणीसाठी शेत पुन्हा तयार करुन ठेवले जाते. जून-जुलैला पावसाच्या आगमनानंतर पेरणी केली जाते. पण या मधल्यावेळात कोकणातील शेतकरी बांधव निवांत असतात. म्हणून पूर्वी मार्च महिन्यात कोकणात शिमगा मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा आजही होतो.

- Advertisement -

Holi 2021 how to celebrate holi in konkan raigad sindhudurga, ratnagiri
Holi 2021: कोकणात ‘अशी’ साजरी केली जाते होळी

शिमगोत्सवाचा कोकणवासियांचा सुखांचा क्षण

रत्नागिरीत शिमग्याचा मोठा उत्साह असतो. प्रत्येक गावात ग्रामदेवतेच्या साक्षीने परंपरा साजरी करण्याची पद्धत बदलते. गावांत प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा दिवस असतो. काही ठिकाणी पौर्मिमेच्या रात्री होम केला जातो. फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात. आणि नंतर पुढील काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आमि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. काही गावांमध्ये होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा आहे. यादरम्यान ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे(देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणली जाते. सहाण म्हणजे गावातील चावडी. कोकणात प्रत्येक गावानुसार पालखीची प्रथाही बदले. अनेक गावांतील गावदेवीचे (ग्राम देवता) मंदिर दूर जंगलात, कडेकपारीत असते. या देवळातून पालखी सजवून ढोल ताशांच्या, पारंपारिक वाद्यांच्या गजरात सहाणेवर होळीच्या आधल्या दिवशी आणली जाते. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरु होतो. गावाच्या चावडीवर अनेक गावकरी रात्र जागवत पालख्या नाचवतात.

यानंतर आंब्याची किंवा सुरमाडाच्या झाड तोडत होळी तयार करतात. ही होळी जवळपास ५० फूड पेक्षा उंच असते. ही होळी जंगलातून तोडल्यानंतर गावकरी खांद्यावर नाचवत गावच्या सहाणेवर पालखीसमोर आणून उभी करतात. पहाटेपर्यंत हा उत्साह असतो. मागच्या वर्षीच्या होळीच्या खुंटात ही होळी उभी केली जाते. व त्याभोवती गवत आणि इतर सजावट केली जाते. या होळी भोवती गावकरी पूजा करत मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात. अनेक गावात नारळ, मिठाई, अंडी, कोंबड्या अक्षतांच्या पूर्णत्वाची आहुती अर्पण करतात. यावेळी मोठ मोठ्य़ाने गावकरी बोंब, आरोळ्या ठोकतात. यावेळी बोंब किंवा आरोळ्या ठोकण्याची प्रथाही वेगळ्या आहेत.

दुसऱ्या दिवशी गावकरी परत सहाणेवर जमतात. त्यानंतर होळीच्या शेंड्य़ाखाली सगळं गाव उभे राहत गाऱ्हाणे नावाचा कार्यक्रम करतात. वर्षानूवर्ष ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणाचाराला येतात असं कोकणात मानल जातं. घरोघरी ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी दाखवून देवाची पुजा केली जाते. यामध्ये मागच्या वर्षी केलेले नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असे सोहळा असतो. यानंतर गावची बैठक असते. यात गावच्या विषयांवर चर्चा होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पालखीच्या खुणा ठेवण्याचा कार्यक्रम असतो. यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणेसमोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो, तो नारळ पालखी हुडकून काढते. हे पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी असते. असे पुढील ३ ते ४ दिवस गावांत पालखी घरोघरी फिरवली जाते व रात्री पालखी पुन्हा सहाणेवर आणून ठेवली जाते. त्यावेळी रात्री पालखी नाचवण्याचे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. गावातील प्रत्येक घरात पालखी नाचवताना पाहणे हा क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो. यावेळी अनुभवी गावकरी डोक्यावर पालखी घेऊन बेभान होऊन नाचतात. गावाच्या वेशीवर आजूबाजूच्या गावातील ग्रामदेवता एकमेकींना भेटण्यासाठी येतात. यावेळी पालखी नाचवताना त्या एकमेकींची ओटी भरतात असं म्हटलं जातं. यासाठी पालखी नाचवताना पालख्यांमधील ओटीचे खण-नारळ बदलण्यात येतात. कोकणवासियांसाठी हा क्षण असविस्मरणीय असतो. पालखी नाचवण्याचा प्रकार प्रत्येक गावाच्या परंपरेनुसार निरनिराळा असतो. त्यामुळे पालखी नाचवताना पाहण्यासाठी प्रत्येत गावचे ग्रामस्थ इतर गावांमध्येदेखील जातात. काही ठिकाणी या निमित्ताने दशावतार, सिनेमा, सोंग भजन -किर्तन अशा मनोरंजक गोष्टींचे आयोजन केले जाते.

Holi 2021 how to celebrate holi in konkan raigad sindhudurga, ratnagiri
Holi 2021: कोकणात ‘अशी’ साजरी केली जाते होळी

कोकणातील शिमग्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सोंग. होळीच्या निमित्ताने अनेक गावात नमन, कापडखेळे, टिपरीखेळे, संकासूर, आणि सोंग खेळली जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारांमधून आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेली जाते. शेरत्नागिरी, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यांतील नमनप्रेमींनी प्राचीन काळापासून ही लोककला जोपासून शासकीय विविध योजनांविषयीची जनजागृती करण्याबरोबर समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कामही करीत आहेत. नमनामध्ये ३० ते ४० लोकांचा सहभाग असतो. त्यांची एक विशिष्ट वेशभूषा असते. एका विशिष्ट झगेदार पोशाखात हे कलाकार दोन रांगेत आडवे- उभे राहतात. प्रत्येकाच्या हातात टाळ, डोक्यावर रंगीबेरंगी पगडी, गळ्यात रंगीत ओढण्या असतात. रांगेच्या मध्यभागी असलेला सूत्रधार मात्र संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असतो. सुरुवातीला बारा किंवा सोळा नमने सादर केली जातात.बारा नमनांनंतर संकासूर प्रवेश करतो. त्याचा पोशाख दशावतारातील संकासुरासारखा असतो. त्याने उंच काळी टोपी घातलेली असते. दिसण्याकरिता दोन छिद्रे ठेवलेली असतात. तो मूकपणे नृत्य करीत असतो. कधीकधी त्याच्याबरोबर स्री वेशातील पुरुषही नाचत असतो. एक सोंग गेल्यावर दुसरे सोंग येईपर्यंतचा काळ हा संकासूर, मृदुंगवादक यांच्या, गाण्याचा व मृदुंगाच्या तालावर नाचण्याचा असतो.नमन गाणाऱ्या मंडळीच्या कडेला दोन मृदुंग वाजविणारे असतात. या लोककलेत ‘गणगौळण’प्रमाणेच आणखीही काही सोंगे असतात. सोंगात सर्वप्रथम गणपती बाप्पांना अग्रक्रम आहे. गणेशाचे पूजन सादर करतानाच गणेशाची आख्यायिका गाण्यातून सादर केली जाते.गण सादर झाल्यानंतर ‘गवळण’ सादर केली जाते. शिमगोत्सवात घरोघरी खेळे सादर होतात. याशिवाय काही गावातून गोमूचा अथवा संकासूराचा नाच हा देखील कार्यक्रम होत असतो. वास्तविक दोन्ही पात्रे नमनातीलच आहेत. आजही ही परंपरा अनेक गावांमध्ये जोपासली जात आहे. सिंधुदुर्ग भागातही ही सोंग खेळली जातात. कोकणातील कोळी, आदिवासी बांधवांची ही होळी साजरी करण्याची प्रथा वेगळी आहे.

Holi 2021 how to celebrate holi in konkan raigad sindhudurga, ratnagiri
Holi 2021: कोकणात ‘अशी’ साजरी केली जाते होळी

अशी पारंपारिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या कोकणातील होळीचा उत्साह गावकऱ्यांच्या वर्षभर स्मरणात राहतो. गावाबाहेर राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी होळीनिमित्त चार दिवस अगदी आनंदाने जगता येते. कोकणाच्या आंबा, फणस, काजू, पोफळीच्या बागा, अथांगसमुद्र अशी वातावरणात मुंबई करताना चार दिवसका होईना शांत जगता येते. या शिमग्याच्यानिमित्ताने धावपळीत थकलेला जीवांना विसावण्याची संधी मिळते.


 

- Advertisement -