“बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शरद पवारांच्या चरणी ठेवला होता”, अमित शाहांकडून खरपूस समाचार

कोल्हापुरात आयोजित केलेल्या भाजपच्या विजय संकल्प सभेत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी २०२४ च्या निवडणुकांमध्ये ४८ जागांवर शिवसेना-भाजपच्या विजयाचा संकल्प व्यक्त केलाय.

Amit-Shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. कोल्हापुरात आल्यानंतर अमित शाहांनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचं सपत्नीक दर्शन घेतलं. त्यानंतर कोल्हापुरात आयोजित केलेल्या भाजपच्या विजय संकल्प सभेत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी २०२४ च्या निवडणुकांमध्ये ४८ जागांवर शिवसेना-भाजपच्या विजयाचा संकल्प व्यक्त केलाय. सोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा खरपूस समाचार घ्यायला मात्र विसरले नाहीत.

यावेळी बोलताना अमित शाह यांनी येत्या २०२४ च्या निवडणुकांसाठी मोठी घोषणा केलीय. २०२४ च्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप एकत्र लढणार आहे, असं अमित शाह यांनी या सभेत जाहीर केलंय. तसंच बाकी उरले सुरले पक्ष एकत्र येऊन एकाच डब्ब्यात राहून भाजपविरोधात लढणार आहेत, असं देखील ते म्हणाले. यावेळी अमित शाह यांनी काही काळ मागे जाऊन लोकांना २०१४ पूर्वीच्या सरकारच्या काळाची आठवण करून दिली. याविषयी बोलताना अमित शाह म्हणाले, “२०१४ च्या पूर्वीच्या सरकार काळात दररोज भ्रष्टाचार, दहशतवादी हल्ले, निर्णयाची कोणतीही प्रक्रिया नव्हती, घोटाळे, कधी सुप्रीम कोर्ट आदेश देत होते. त्या सरकार काळात पंतप्रधानांना कोणी पंतप्रधान मानत नव्हते आणि ते सोडून बाकी सगळे स्वतःला पंतप्रधान समजत होते. कॉंग्रेस सरकार काळात देशात अराजकता होती.” असं देखील अमित शाह म्हणाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या. नरेंद्र मोदींचे मोठे फोटो आणि स्वतःचे छोटे फोटो लावून हे जिंकून आले. विजय मिळाल्यानंतर सर्व सिद्धांत पायदळी तुडवत हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शरद पवारांच्या चरणी ठेवला आणि स्वतः मुख्यमंत्री बनले, असं देखील अमित शाह म्हणाले. पण आता सगळं चित्र स्पष्ट झालं आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकांमध्ये खरी शिवसेना ही धनुष्यबाण घेऊन भाजपसोबत एकत्र आली आहे आणि ४८ पैकी ४८ जागा जिंकून आणणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसंच ज्यांनी विश्वासघात केला त्यांना धडा शिकवायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय.