Phone Tapping Case: नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावर गृहमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

राज्यातील नेत्यांच्या फोप टॅपिंग प्रकरणातील तपासातून काल, मंगळवारी एक धक्कादायक माहिती समोर आली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा फोन तब्बल 60 दिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन 67 दिवस टॅप करण्यात आल्याची तपासातून समजले. याच पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की,’नेत्यांचे फोन टॅपिंग झाले हे खरं आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल.’

आज सकाळी माध्यमांशी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘त्या काळामध्ये काही नेत्यांचे फोन टॅप करण्याचा प्रयत्न झाला. ज्यावेळेला महाविकास आघाडीचे सरकार बनत होते, त्यावेळेला आपापसात काय चर्चा सुरू आहे? याची माहिती काढण्याच्या दृष्टीकोनातून त्यावेळेच्या इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी फोन टॅप केले होते. या संपूर्ण प्रकरणात चौकशी सुरू केलेली आहे. चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या घटनेतील आरोपींसंदर्भात सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत गृहमंत्री म्हणाले की, ‘सध्या प्रकरण न्यायालयात असल्यामुळे यावर जास्त भाष्य करणे योग्य नाही. पण या प्रकरणाची चौकशी सुरू असून अंतिम अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. शरद पवार यांच्या घराजवळील हे आंदोलन नसून हा हल्ला होता.’


हेही वाचा –  ईडी, सीबीआयच्या धमक्या दिल्या अन् सौदा करण्यासाठी बँकॉकमध्ये पैसे गोळा केले; राऊतांचा खळबळजनक दावा