जालना – मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी ताशेरे ओढले. मनोज जरांगे म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साफ खोटं बोलत आहेत. पोलिसांनी बंदूकी ताणल्या होत्या. गोळ्या घालत होते. त्यामुळे मराठा आंदोलकांनी मला संरक्षण देत वेढा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेले विधान हे सपशेल खोटो आहे. गृहमंत्रीपदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने खोटे बोलणं योग्य नाही. पोलिसांबद्दल ममत्व वाटत असणाऱ्या गृहमंत्र्यांनी नेमके काय घडले हे समजून घेऊन बोललं पाहिजे असं जरांगे म्हणाले.
काय म्हणाले होते गृहमंत्री
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) काल म्हणाले होते, ‘जालना येथील मराठा आंदोलक – उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली होती. आम्हाला माणूस मरु देता येत नाही.’ यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, ‘पोलिस गोळ्या घालत होते. म्हणूनच मराठा आंदोलकांनी (Maratha Andolan) मला वेढा टाकला होता. फडणवीस माझ्यावर उपचार करायचं म्हणतात, पण गेल्या दोन दिवसांपासून येथे डॉक्टरच उपलब्ध नव्हते. हे तुम्ही तुमच्या प्रशासनाला विचारा. राज्याच्या गृहमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला असं खोटं बोलणं शोभत नाही.’
हेही वाचा : “इंडिया आघाडीवरून लक्ष विचलित करण्यासाठी लाठीमाराचे आदेश”, संजय राऊतांना संशय
‘जाळपोळ करणाऱ्यांशी मराठा आंदोलनाशी संबंध नाही’
अंतरवली सोराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. या हिंसक घटनांशी मराठा आंदोलकांचा कोणताकही संबंध नाही. असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. मराठा बांधव शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. आपल्याला कोणताही उद्रेक करायचा नाही. शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन सुरु असून त्याच मार्गाने आम्हाला पाठिंबा द्या असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
आंदोलनला बदनाम करण्यासाठी कुठेतरी गाड्यांची जाळपोळ आणि रस्त्यावर टायर जाळले जात असल्याची माहिती असल्याचे जरांगे म्हणाले.
गृहमंत्र्यांना पोलिसांनी केलेले अत्याचार दिसलेले नाहीत. त्यांना पोलिसांची एवढी माया येते त्यांनी आंदोलनात धिंगाणा घालणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असेही जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे यांच्याशी फोनवर संपर्क साधला आहे.