बेस्ट उपक्रमाच्या वर्धापनदिनानिमित्त ‘होप ऑन होप ऑफ’ सुविधा, पर्यटकांसाठी अशी असणार बस सुविधा

बेस्ट प्रवाशांना व वीज ग्राहकांना चांगली सेवासुविधा बहाल करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला ७ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली असून बेस्ट उपक्रमातर्फे “अमृतमहोत्सव’ रविवारी जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने उपक्रमांच्या वतीने मुंबईकरांसाठी विविध योजना सादर करण्यात येत आहेत. बेस्ट परिवहन विभागाकडून पर्यटकांसाठी दुसरी ‘होप ऑन होप एसी बससेवा’ सुरू रविवारपासून सुरू करण्यात आली आहे.

ही बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रवर्तित होऊन म्युझियम, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, बाबुलनाथ, पेडर रोड, हाजी अली, महालक्ष्मी रेस कोर्स, धोबीघाट, जिजामाता उद्यान व प्राणी संग्रहालय मार्गे जे. जे.उड्डाण पुला मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी चालविण्यात येत आहे.

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबई शहरात देश – विदेशातून हजारो पर्यटक नियमितपणे पर्यटनासाठी येत असतात. राज्य सरकार विशेषतः पर्यटन खात्यामार्फत पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी विविध सेवासुविधा बहाल केल्या जातात. मुंबई महापालिका व बेस्ट उपक्रम यांच्याकडूनही पर्यटकांसाठी विविध सेवासुविधा उपलब्ध करण्यात येतात.

बेस्टच्या पर्यटन बस फेरीला सध्या चांगला प्रतिसाद लाभत आहे. पर्यटन सेवेचा एक भाग म्हणून बेस्ट उपक्रमाने यापूर्वी पर्यटकांसाठी वरीप्रमाणे एक बससेवा सुरू केली होती आता बेस्टतर्फे ‘अमृतमहोत्सव’ निमित्ताने पर्यटकांसाठी दुसरी ‘होप ऑन होप एसी बससेवा’ रविवारपासून सुरू करण्यात आली आहे.

पर्यटकांसाठी अशी असणार बस सुविधा

मुंबई भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित आणि किफायतशीर बससेवा पुरवण्यासाठी बेस्टकडून होप ऑन होप ऑफ एसी इलेक्ट्रिक पर्यटन बससेवा सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या एका ठिकाणाहून दर एक तासाच्या अंतराने बस सेवा देण्यात येत आहे.

या बससेवेचे पर्यटन शुल्क प्रति व्यक्ती प्रति बसफेरी सर्व करांसहित १५० रुपये असणार आहे. या बस सेवेचे खास वैशिष्ट्य म्हणजे पर्यटक एखादया पर्यटनस्थळी बसगाडीतून उतरून त्या पर्यटनस्थळाची पाहणी केल्यानंतर पुढच्या फेरीच्या बसगाडीतून पुढील पर्यटन स्थळापर्यंत प्रवास करू शकतो. पर्यटकांना सदर बससेवेव्यतिरिक्त बेस्ट उपक्रमाच्या इतर बसमार्गांचा वापर करून देखील पर्यटन स्थळे पाहता येणार आहेत.


हेही वाचा : काही अपमान करण्याचा उद्देश नाही, मुख्यमंत्र्यांना तिसऱ्या रांगेत उभे करण्यावरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली