घरताज्या घडामोडीहॉटेल व्यवसाय बंदचा एसटीला ४० कोटींचा फटका!

हॉटेल व्यवसाय बंदचा एसटीला ४० कोटींचा फटका!

Subscribe

एसटीच्या प्रवाशांना उत्तम सुविधा मिळण्यासाठी आणि एसटीचा महसूल वाढविण्याकरिता राज्यभरात अधिकृत हॉटेलांमध्ये प्रवाशांसाठी एसटीचा थांबा दिला जातो. हॉटेल मालकांकडून एसटीच्या प्रत्येक फेरीवर थांब्यासाठी एसटी महामंडळाला पैसे मिळत असतात. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता एसटीचे हॉटेल थांबे बंद करण्यात आल्यामुळे दर महिन्याला 8 कोटी रुपयांचा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. तसेच गेल्या पाच महिन्यांपासून एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने हॉटेल थांब्यापासून मिळणार्‍या जवळ जवळ ४० कोटी रुपये महसूलाचे नुकसान महामंडळाला झाले आहे.

खासगी वाहतुकीच्या तुलनेत एसटी महामंडळाने एसटीच्या प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी ३० रुपयांमध्ये चहा-नाश्त्याची योजना सुरू केली होती. त्यासाठी एसटीने राज्यात अधिकृत थांबे निवडले होते. त्याठिकाणी असलेल्या हॉटेलांमध्ये तिकीट दाखवल्यानंतर प्रवाशांना प्रसाधनगृहाची सोय आणि चहा-नाश्त्याची अल्प दरात सेवा मिळत होती. एसटीला प्रत्येक फेरीमागे अधिकृत हॉटेल मालकांकडून ठराविक रक्कम महामंडळाला मिळत होती. त्यामुळे एसटीच्या महसुलात वाढ झाली होती. सोबतच एसटीच्या प्रवाशांना सुद्धा मोठ्या प्रमाणात सुविधा मिळत होती. या हॉटेल थांब्यातून एसटी महामंडळाला दर महिन्याला जवळ जवळ ८ कोटी रुपये महसूल मिळत होते. मात्र, कोरोनामुळे हा महसूल आता बंद झाला आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली आखून देण्यात आली आहे. त्यानुसार एसटी बसमध्ये केवळ २२ प्रवासी घेऊन जाण्याची अट घातली आहे. त्यामुळे डिझेलचे पैसे देखील निघत नाहीत. तसेच हॉटेल थांबे सुद्धा बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे एसटीला उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्याने एसटी महामंडळावर आर्थिक संकट आले आहे.

- Advertisement -

असा मिळत होता महसूल

एसटी महामंडळाचे प्रवासादरम्यान थांबा घेणार्‍या हॉटेलमध्ये हॉटेल चालकांकडून थांबा आकार रक्कम म्हणून व्होल्वोसाठी शिवशाहीसाठी २७५ रुपये अधिक ५० रुपये जीएसटी असे एकूण ३२५ रुपये आकारले जात होते. तर निमआराम गाड्यांसाठी १६७ रुपये अधिक जीएसटी असे एकूण २०८ रुपये आणि साध्या एसटीसाठी १३२ रुपये अधिक २४ रुपये जीएसटी असे एकूण १५६ रुपये आकारले जात होते. मात्र, कोरोना काळात आता हा थांबा काढून टाकण्यात आल्याने एसटीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -