पुणे तिथे काय उणे!; बंगल्यासाठी लावले तब्बल २५० ‘जॅक’

तब्बल २५० जॅक वापरून बंगल्याची उंची वाढवण्याचा निर्णय पुण्यातील बंगला मालकांनी घेतला आहे. जॅकच्या साहाय्याने उंची वाढवण्याच्या या तंत्रज्ञानाला हाऊस लिफ्टिंग असे म्हणतात.

jack
बंगल्याची उंची वाढवण्यासाठी वापरले २५० जॅक

गाडी पंक्चर झाल्यावर जॅक लावला जातो हे तुम्हाला माहित आहे. पण, बंगल्यासाठी जॅक वापरून बंगल्यांची उंची वाढवल्याचे तुम्हाला कुणी सांगितले. तर, तुम्ही विश्वास ठेवाल? पण ही शक्कल पुण्यात वापरली गेली आहे. २००० क्वेअर फुटाच्या बंगल्यासाठी २५० जॅक वापरले गेले आहेत. जॅकच्या साहाय्याने बंगल्याची उंची वाढवण्याच्या या तंत्रज्ञानाला ‘हाऊस लिफ्टिंग’ असे म्हणतात. जॅक लावून बंगल्याची उंची वाढवण्याचा नेमका हा काय प्रकार आहे? यासाठी पुण्यात बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली होती.

काय आहे हाऊस ‘लिफ्टिंग तंत्रज्ञान’

पुण्यातील बी. टी. कवडे रस्त्यावरील तारदत्त कॉलनीमध्ये भारद्वाज नावाचा बंगला आहे. बंगल्यासमोर अनेक वर्षापासून रस्त्याच्या दुरूस्तीची कामे होत राहिली. त्यामुळे रस्त्याची उंची वाढली. मात्र, बंगल्यापेक्षा रस्त्याची उंची वाढल्याने पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी घरात घुसत होते. दरवर्षी हा त्रास वाढत होता. परिणामी बंगला मालक वैतागले होते. त्यामुळे काहीही करून त्यांना बंगल्याची उंची वाढवून ती रस्त्याच्या उंचीला आणयची होती. यासाठी बंगला मालक अनेक वर्षापासून पर्यायाच्या शोधात होते. पण, बंगल्याची उंची वाढवणे हे काम कठीण. कोणतेही काम करताना अत्यंत खबरदारी घेणे गरजेचे होते. कारण त्यामुळे बंगल्याच्या बांधकामाला धोका देखील पोहचू शकत होता. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर बंगला मालकांना हाऊस लिफ्टिंग तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली. अखेर, बंगला मालकांनी हाऊस लिफ्टिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने बंगल्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हरियाणाच्या ठेकेदाराला त्यांनी ‘भारद्वाज’ बंगल्याचे काम दिले. २००० क्वेअर फुट बंगल्याची उंची वाढवण्यासाठी तब्बल २५० जॅक वापरण्यात आले. बंगल्याची उंची वाढवण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पाया कापून शेकडो जॅकच्या मदतीने बंगला उचलण्यात आला असून गॅपमध्ये वीटा रचून बंगल्याची उंची वाढवण्यात येणार आहे. पुण्यामध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. हाऊस लिफ्टिंग तंत्रज्ञान नेमके काय आहे? या उत्सुकतेपोटी लोकांनी बंगल्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायाला मिळत आहे. यावरून एक गोष्ट मात्र नक्की पुणे तिथे काय उणे!