एकनाथ शिंदेंच्या गोटात सेनेचे किती मंत्री, तर ठाकरेंकडे किती उरले मंत्री?

eknath shinde

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिंदेंच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जवळपास शिवसेनेचे ४१ आमदार आणि अपक्ष ६ असे मिळून ४७ आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसला आहे. आज देखील सेनेचे सहा आमदार गुवाहाटीत दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असता शिवसेनेत किती मंत्री उरले?, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ठाकरेंकडे किती उरले मंत्री?

एकनाथ शिंदे यांच्यात गटात शिवसेनेचे १० मंत्री सामील झाल्यानंतर शिवसेनेत फक्त ५ मंत्री उरले आहेत. यामध्ये हे सर्व मंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत. विधानसभेचे दोन आमदार आणि विधानपरिषदेचे तीन आमदार असे एकूण पाच मंत्री सेनेत उरले आहेत. विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे, आमदार शंकरराव गडाख, तर विधानपरिषदेचे आमदार स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार अनिल परब आणि माजी आमदार सुभाष देसाई असे एकूण ५ मंत्री उरले असून हे सर्व उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत.

माजी आमदार सुभाष देसाई यांचा कार्यकाळ संपला आहे. तर राज्याचे परिवहन मंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांच्यामागे ईडीचा ससेमेरा लागला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे नेते अनिल परब हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात समील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ शिंदेंच्या गोटात सेनेचे किती मंत्री?

एकनाथ शिंदे यांच्या गोटात आमदार उदय सामंत, आमदार गुलाबराव पाटील, आमदार शंभुराज देसाई, आमदार एकनाथ शिंदे, आमदार बच्चू कडू, आमदार राजेंद्र यड्रावकर, आमदार दादा भुसे, आमदार संजय राठोड, आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार संदीपपान भुमरे, असे मिळून दहा मंत्री हे शिंदेंच्या गटात आहेत.

राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राज्य शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल ट्विटर हँडलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवून युवासेना प्रमुख असं ठेवलं. तर खासदार संजय राऊतांनी सुद्धा विधानसभा बरखास्तीच्या दिशेने..,अशा प्रकारचं ट्विट केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची दाट शक्यता होती. मात्र, आज ते शिवसेनेच्या आमदार, खासदारांसोबत मुंबईत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीतून महाविकास आघाडीची पुढील रणनिती काय असेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली असून भाजपच्या पाठिंब्याचे पत्र लवकरच ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. त्यामुळे शिंदेंची पुढची राणनिती काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा : शिवसेनेत उरले कोण?, 55 आमदारांपैकी उरले केवळ 10 आमदार