मुंबई : जालनामध्ये मराठा आंदोलनावर झालेल्या लाठीमाराबद्दल उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सरकारच्या वतीने माफी मागितली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मराठा समाजासाठी राज्य सरकारतर्फे कोणकोणत्या योजना राबविल्या जात आहेत, याची जंत्रीच दिली. तोच धागा पकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, आणखी किती फसवणूक मराठा समाजाची करणार? असा सवाल राज्य सरकारला केला आहे. तसेच, त्यांनी राज्य सरकारकडे चार प्रश्नांची उत्तरे मागितली.
काल राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले”, सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी आम्ही दोन हजार कोटी रुपये दिलेत.” मुख्यमंत्री महोदय ही बघा सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीची अवस्था. आणखी किती फसवणूक मराठा समाजाची करणार ?
माझे सरकारला चार प्रश्न आहेत. त्याची उत्तर सरकारने द्यावी
प्रश्न १)…
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 5, 2023
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. शुक्रवारी पोलिसांकडून या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या घटनेचे पडसाद राज्यातील विविध भागांमध्ये उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काल, सोमवारी पत्रकार परिषद घेत, या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच, याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – “वेळ लागला तरी चालेल, पण आरक्षण टिकले पाहिजे”, मराठा आरक्षणावर शिंदे गटाची भूमिका
या पत्रकार परिषदेबाबत खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत टीका केली आहे. सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी आम्ही दोन हजार कोटी रुपये दिले, असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीची अवस्था आधी बघा. आणखी किती फसवणूक मराठा समाजाची करणार? असा सवाल खासदार राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा – “ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा…”, विजय वडेट्टीवारांची मागणी
खासदार संजय राऊत यांनी सरकारला चार प्रश्न विचारले आहेत –
- ‘सारथी’द्वारे पदवीसाठी 30 लाख, तर पीएचडी साठी 40 लाखांच्या मर्यादित शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र, ओबीसी व समाजकल्याण विभागाद्वारे परदेशी शिष्यवृत्तीमध्ये पूर्ण अभ्यासक्रम शुल्क (रकमेची मर्यादा नाही), याशिवाय विमान प्रवास भाडे, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा, स्टेशनरी शुल्क, अर्जाचे शुल्क देण्यात येते. याला कोणतीही मर्यादा लावली जात नाही. मात्र, सारथीला मर्यादा का?
- 75 जागांसाठी फक्त 82 अर्ज संस्थेला प्राप्त झाले आहेत. आपल्या जाचक अटींमुळे विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे, तरी सारथीने मुदतवाढ का दिली नाही?
- ओबीसी आणि समाजकल्याणसाठी पदवीला 55 ते 60 टक्क्यांची अट, मग सारथीला 75 टक्क्यांची अट का?
- जाहिरातीवर कोट्यवधी खर्च, मग सारथीच्या योजनावरती का नाही?