SSC Board Exam: दहावीच्या परीक्षांचे होणार तरी काय? ऑनलाईन घेणे शक्य आहे का?

दहावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रम.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही राज्य शिक्षण मंडळ म्हणजेच एसएससी (SSC Board Exam) बोर्डाची दहावीची लेखी परीक्षा रद्द होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत तज्ज्ञांशी बोलून निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यामुळे आता दहावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास परीक्षा ऑनलाईन घेणे कितपत योग्य ठरणार? तसेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर त्याचा काय परिणाम होईल? या सर्वच प्रश्नांचा आढावा आपण घेतला आहे.

दहावीची परीक्षा रद्द करावी का?

सीबीएसईप्रमाणे एसएससी बोर्डाची परीक्षा रद्द करता येऊ शकते का? याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विचार सुरु असल्याचे मत मांडले आहे. त्यामुळे सध्या २९ एप्रिल ते २१ मेपर्यंत घेण्यात येणारी परीक्षा आता जूनमध्ये घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, परीक्षा रद्द करावी का? याबाबत प्रभादेवी म्युनिसिपल सेंकेंडरी स्कूल क्रमांक – २ या शाळेचे मुख्यध्यापक निवास शेवाळे यांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितले की, ‘जर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला तर यामध्ये विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. कारण विद्यार्थ्यांना त्यांची बौद्धिक क्षमता कळू शकणार नाही. महत्त्वाचे म्हणजे अकरावी प्रवेशासाठी दहावीचे गुण खूप महत्त्वाचे असतात. त्यावरुन विद्यार्थ्यांच्या करीअरची दिशा ठरवण्यात येते. त्यामुळे जर विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली तर विद्यार्थ्यांसह पालकांचा आणि शिक्षकांचा देखील गोंधळ निर्माण होईल. कारण परीक्षा न घेता निकाल कशाच्या आधारावर जाहीर करणार? आणि प्रवेश तरी कसा देणार? विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य आणि कला नेमकी कोणती शाखा निवडावी, हे देखील कळणे फार कठिण होईल. त्यामुळे बोर्डाला परीक्षा रद्द करण्यापूर्वी ठोस पर्याय शोधावा लागेल.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर होणार परिणाम?

दहावीची परीक्षा घेण्यात आली नाही तर अकरावीच्या इयत्तेचा प्रवेश कसा द्यावा? हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे काही शाळा या बारावीपर्यंत असतात, त्यामुळे ते विद्यार्थी त्यांच्या शाळेत वरील इयत्तेत प्रवेश घेतील. मात्र, ज्या विद्यार्थ्यांच्या शाळा या केवळ दहावीपर्यंतच आहे, त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यांनी कसा आणि कुठल्या आधारावर प्रवेश घ्यावा.

ऑनलाईन घेणे शक्य आहे का?

एकीकडे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, ‘शाळांनी वर्षभर ऑनलाईन शिक्षण दिले तर परीक्षा ऑफलाईन का घेत आहात? शिक्षण ऑनलाईन देण्यात आले आहे तर परीक्षा देखील ऑनलाईनच घेण्यात यावी. याबाबत महापालिकेचे मुख्यध्यापक निवास शेवाळे यांचे म्हणणे आहे की, ‘ऑब्जेक्टिव्ह (objective) परीक्षा पद्धती अवलंबण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांकडे इंटरनेट, मोबाईल आणि संगणकची सुविधा असणे गरजेचे आहे. यामुळे ग्रामीण आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केवळ २० गुणांची इंटरनल परीक्षा झाली आहे. त्यामुळे त्या आधारावर पूर्ण निकाल जाहीर करता येणे शक्य नाही. जर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या तर त्याचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी त्या-त्या शाळेंना देण्यात यावी’.

हुशार मुलांचा परीक्षा रद्द करण्यास विरोध

विद्यार्थ्यांमधील जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांचा परीक्षा रद्द करण्यास विरोध आहे. त्यांच्या मते परीक्षा घेऊनच निकाल लावण्यात यावा. तर इतर मुलांचा परीक्षा रद्द करण्यात यावी, असे मत आहे.


हेही वाचा – Medical Exam Postponed : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा जूनमध्ये होणार