Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एचआर-सीटी करणे घातक

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एचआर-सीटी करणे घातक

एकाने एचआर-सीटी केली म्हणून दुसऱ्याने केली आणि स्वतःला कोरोना नसल्याचे समजून निर्धास्त झाला.. गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर असेच काहीसे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याविना परस्पर अशा चाचण्या करणे अनेकांच्या जीवावर बेतले असल्याचे पुढे आले आहे. आजच्या या भागात शरीरातील सर्वात नाजूक अवयव असलेले फुफ्फुस, त्याची कार्यक्षमता जाणून घेतानाच एचआर-सीटी म्हणजे काय आणि त्याचा स्कोअर काय असतो हे आजच्या दुसऱ्या भागात समजून घेणार आहोत.

Related Story

- Advertisement -

शरीरात असूनही बाह्य वातावरणाशी सर्वाधिक संपर्क येणारे, इतर अवयवांच्या तुलनेत सर्वात नाजूक फुफ्फुस अखेरच्या श्वासापर्यंत अखंड कार्यरत असतं. अर्थात त्याचं कार्य थांबलं की श्वास थांबतो. म्हणूनच कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोरोना विषाणू हा प्रामुख्याने श्वसनप्रणालीवर हल्ला करणारा असल्याने कोरोना संसर्गाचा फुफ्फुसावर किती परिणाम झाला आहे, याचे निदान करण्यासाठी एचआर-सीटी केली जाते.

एचआर म्हणजे हाय रिझॉल्युशन अर्थात उच्च सुस्पष्टता आणि सीटी म्हणजे कम्प्युटेड टोमोग्राफी. ही चाचणी केवळ छातीशी संबंधित असते. एखादया वस्तूचे अनेक काप (स्लाइस) केल्यानंतर ज्या पद्धतीने वेगवेगळ्या अँगल्समधून आपल्याला ती वस्तू बघता येते, त्याच पद्धतीने एचआर-सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुसाची तशीच प्रतिमा तयार होते. अलिकडचे स्कॅन मशिन्स हे १६ स्लाईसेसमध्ये फुफ्फुसाचे परिणाम दाखवू शकतात.

- Advertisement -

स्कॅन करताना फुफ्फुसाची प्रत्येकी २ ते ४ मिलिमीटर अंतरावर वेगवेगळ्या बिंदूंमधून प्रतिमा तयार होते. त्यातून फुफ्फुसाचा कोणता भाग संसर्गाने किती प्रमाणात व्यापला आहे, याचे निदान होते. त्यानुसार उपचारांची दिशा ठरते. कोरोनाच्या आजाराचे निदान हे खूप जलदगतीने होऊ शकते. मात्र, त्यासाठी कोरोना चाचणीदेखील तितकीच महत्त्वाची असते.

मानवी फुफ्फुसात उजव्या बाजूला तीन आणि डाव्या बाजूला दोन असे एकूण पाच लोब्ज (कप्पे) असतात. त्या प्रत्येक लोबमध्ये किती संसर्ग झाला आहे, त्यावरून त्याचा स्कोअर ठरतो. एखाद्या रुग्णाचा स्कोअर हा २० असेल तर त्याला झालेला संसर्ग हा गंभीर स्तरावर असल्याचे मानले जाते. हा स्कोअर ५ पेक्षा खाली असेल संसर्गाची सौम्य सुरूवात मानली जाते. अनेकदा स्कोअरपेक्षा फुफ्फुस किती प्रमाणात व्यापले गेले आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरते आणि स्कॅननंतर मिळणारी फिल्म बघितल्यानंतरच त्यातून अचूक निदान शक्य होते.

आधी निदान मग करा चाचणी

- Advertisement -

सोशल मीडियावरुन कोरोनाबाबत जी अर्धवट माहिती प्रसारित केली जाते आहे, तीच अचूक मानून अनेक व्यक्ती परस्पर एचआर-सीटी करतात. एखादा आजार झाला किंवा नाही याचे निदान करण्याऐवजी त्याचा प्रभाव झालाय का, हे पाहण्यासारखा हा प्रकार आहे. अनेकदा कोरोनाचा संसर्ग हा फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यासाठी पाच ते आठ दिवसांचा कालावधी लागत असतो. त्यापूर्वीच एचआर-सीटी केल्यास त्यात कोणताही संसर्ग आढळून येत नाही. अशावेळी रुग्ण निर्धास्त होतो आणि नेमक्या याच कालावधीत, संसर्ग बळावून रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वप्रथम डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिजेन किंवा आरटी-पीसीआर करावी. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले तरच एचआर-सीटी करावे.

स्कोअर शून्य तरीही संसर्ग

एचआर-सीटी स्कोअर शून्य म्हणजे आपल्याला कोरोना नाही, असा अनेकांचा समज असतो. प्रत्यक्षात संसर्गाचे निदान हे एचआर-सीटी नव्हे तर अँटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचण्यांमधून होत असते. त्यामुळे स्कोअर शून्य आला तरीही संसर्ग सुप्तावस्थेत असू शकतो. संसर्ग झाल्यानंतर तो फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यास तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागत असतो. त्यापूर्वीच एचआर-सीटी केल्यास त्यात काहीही आढळून येत नाही. अनेकदा रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण (ऑक्सिजन सॅच्युरेशन) हे चांगले असतानाही पाचव्या-सहाव्या दिवसापर्यंत एखाद्या रुग्णाचा ताप कायम असतो. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने एचआर-सीटी केले जाते. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण चांगले आहे म्हणून एचआर-सीटी करू नये, असेही समजू नये.

योगा-प्राणायाम करण्यापूर्वी हे लक्षात घ्या

अनेक कोरोनाबाधित व्यक्ती सोशल मीडियावरुन आलेल्या लिंकद्वारे लगेचच प्राणायाम-योगासन करायला लागतात. यापूर्वी कधीही योगा-प्राणायाम न केलेल्या व्यक्तींनी आधी शास्त्रशुद्ध पद्धतीने याची माहिती घेतली पाहिजे. त्यानंतरच सुरुवात करावी. स्वतःच्या क्षमतेनुसार संथगतीने दीर्घ श्वसन किंवा अनुलोम-विलोम केल्यास हरकत नाही. परस्पर घेतलेले निर्णय हे घातक ठरू शकतात.

एचआर-सीटी ही कोरोना चाचणीला पर्याय नाही. त्यामुळे आधी निदान मग गरज भासल्यास संसर्गाचे प्रमाण ठरवण्यासाठी एचआर-सीटी केली जाते. अनेक व्यक्ती कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच एचआर-सीटी करतात आणि स्कोअर शून्य आला की निर्धास्त होतात. आठ दिवस गाफील राहिलेले हेच रुग्ण नंतर गंभीर परिस्थितीत दाखल होतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आधी फॅमिली फिजिशियनचा सल्ला घ्या.               

– डॉ. वैभव पाटील, एम.डी., सनराईज हॉस्पिटल

- Advertisement -