मुंबईतील लेदरच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

भायखळा, मदनपुरा येथे लेदरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्यामुळे सदर परिसरात खळबळ उडाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

प्राप्त माहितीनुसार, भायखळा, मदनपुरा येथील तस्लिमा हाईट या बिल्डिंगच्या नजीक असलेल्या लेदरच्या गोदामाला बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. गोदामातील लेदरच्या साठ्यामुळे आग आणखीन भडकली. सायंकाळी ७.५० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाने आगीची तीव्रता पाहता सदर आग स्तर -२ ची असल्याचे जाहीर केले.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ फायर इंजिन, ५ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. सुदैवाने या आगीमुळे कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही ; मात्र आगीमुळे गोदाम जळून मोठी वित्तीय हानी झाली. मात्र ही आग का व कशी काय लागली याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी माहिती घेत आहेत.


हेही वाचा : Rohit Sharma New Look: हिटमॅन रोहित शर्माचं क्लीन-शेव्ह लूक पाहून चाहते झाले घायाळ, Photo Viral