भरधाव कार व दुचाकीच्या धडकेत वयोवृद्ध दुचाकीचालक व त्याची पत्नी ठार झाली. ही घटना सोमवारी (दि.२५) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गंगापूररोडवरील सोमेश्वर फाट्याजवळ घडली. पोलिसांनी कारचालक महिलेस ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Husband and wife killed in speeding car-bicycle collision on Gangapur Road; Female driver detained)
सुरेश वसंतराव वाखारकर (६४,रा. अमृतधाम, पंचवटी) व विद्या सुरेश वाखारकर (६०) अशी मृत पती-पत्नीचे नाव आहे. स्मिता विजय रासकर (५०,रा.डिसूजा कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयित कारचालकाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गंगापूररोडवरील सोमेश्वर मंदिराकडून जेहान सिग्नलकडे वाखारकर दाम्पत्य त्यांच्या दुचाकीने (एम.एच१५ जी.डब्ल्यू४२९४) जात होते. त्यावेळी अचानक समोरून आलेल्या कारने (एम.एच१५ जीएम००६६) वळण घेत दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत वाखारकर दाम्पत्य जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. नागरिकांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुचाकीचालक सुरेश वाखारकर यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी विद्या वाखारकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. पोलिसांनी कारचालक संशयित स्मिता विजय रासकर यांना ताब्यात घेतले आहे. वाखारकर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार पोलीस ठाण्याच्या आवारात आणली आहे.