प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पत्नीला उठवून पतीने रेल्वे रुळांवर फेकले, सीसीटीव्हीत घटना कैद

वसई – एका तरुणाने रेल्वे फलाटावर (Platform) झोपलेल्या पत्नीला उठवून रुळांवर फेकून दिले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून आपल्या दोन मुलांना घेऊन फरार झाला आहे. वसई स्थानकावर हा प्रकार घडला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Husband thrown his wife in front of-train in vasai road station)

वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एक तरुण आपल्या पत्नी आणि मुलांसोबत होता. त्याची पत्नी आणि मुलं फलाटावर झोपली होती. सोमवारी सकाळी चार वाजण्याच्या दरम्यान तरुणाने फलाटावर फेरफटका मारला. सीसीटीव्हीत त्याच्या सर्व हाचलाची कैद झाल्या आहेत. रुळांवरून जेव्हा त्याला ट्रेन येताना दिसली तेव्हा फलाटावर झोपलेल्या पत्नीला त्याने उठवलं. जेव्हा ट्रेन त्याच्याजवळ आली तेव्हा त्याने लागलीच आपल्या पत्नीला रुळांवर फेकून दिले. ट्रेनसोबत धडक झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, आपल्या मुलांना घेऊन आरोपी तत्काळ फरार झाला.

रुळांवर महिलेचा मृतदेह सापडल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीमध्ये हा तरुण दादर ट्रेनमध्ये चढताना दिसला. तसेच, दादरहून तो कल्याण ट्रेनला चढला असल्याचं दिसलं आहे. पोलीस आरोपीचा तपास करत आहेत. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी आयपीएस कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.