मी पक्षप्रमुखांच्या निर्णयासोबत संजय राऊत यांची स्पष्ट भूमिका

पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील आणि सर्व खासदार त्यांच्या मागे उभे राहतील, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराज असल्याचे वृत्त फेटाळून लावले

sanjay raut

मुंबई : शिवसेनेने यापूर्वी अनेकदा राजकारणापलीकडे जाऊन निर्णय घेतले आहेत. टी. एन. शेषन, प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पक्षाबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत.

जो पक्ष आणि पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, मी त्याच्यासोबत असतो. पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील आणि सर्व खासदार त्यांच्या मागे उभे राहतील, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराज असल्याचे वृत्त फेटाळून लावले. सोबतच मातोश्री निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीतील 7 खासदारांच्या अनुपस्थितीमागचे कारणही दिले.

मातोश्री निवासस्थानी जवळपास 3 तास सुरू असलेल्या बैठकीत शिवसेनेच्या १९ लोकसभा खासदारांपैकी १२ जण उपस्थित होते, तर ७ खासदार अनुपस्थित राहिले, तर राज्यसभेवरील तिघा खासदारांपैकी दोघे जण हजर होते. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याची केलेली विनंती संजय राऊत यांना मान्य नसल्याने ते नाराज होऊन या बैठकीतून बाहेर पडल्याची चर्चा रंगली होती. ती संजय राऊत यांनी फेटाळून लावली. तसेच संजय बंडू वारीला गेल्यामुळे, जाधव आजारी असल्यामुळे, तर हेमंत पाटील वेळेत न पोहचल्याने बैठकीला अनुपस्थित राहिले. कलाबेन डेलकर पुरामुळे आल्या नाहीत. संजय मंडलिक आणि अनिल देसाई दिल्लीत आहेत. तसेच भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.

न्यायालयावर पूर्ण विश्वास

शिवसेनेची न्यायालयात लढाई सुरू असून आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय खिशात असल्यासारखी विधाने सध्या भाजपकडून सुरू आहेत. शिंदे-भाजप सरकार हे राज्यावर लादलेले आणि बेकायदेशीर सरकार आहे. त्यासाठी भाजपकडून राजभवनाचा गैरवापर करण्यात आला, असेही राऊत म्हणाले.


हेही वाचाः मुख्यमंत्री शिंदे गडचिरोलीच्या दौऱ्यावर, संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी योजना राबवण्याचा निर्णय