घरमहाराष्ट्रते शिवसेनेचे नगरसेवक होते हे मला माहिती नव्हते

ते शिवसेनेचे नगरसेवक होते हे मला माहिती नव्हते

Subscribe

पारनेरमध्ये शिवसेना नगरसेवक फोडीच्या घटनाक्रमावर अजित पवारांनी गुरुवारी पहिल्यांदाच भाष्य केले.सारथी संस्थेशी संबंधित बैठकीसाठी मंत्रालयात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगरच्या पारनेरमधील फोडाफोडीवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रकारांना सांगितला. अजित पवार म्हणाले की, शनिवारी मी बारामतीत होतो. त्यावेळी आमदार निलेश लंके मला भेटण्यासाठी आले. काही अपक्ष नगरसेवकांना पक्षात यायचं आहे, असा निरोप त्यांनी पाठवला. त्यानंतर मी त्यांना भेटलो. त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांच्या गळ्यात पक्षाचा गमछा घालून त्यांचे स्वागत केले, असे अजित पवारांनी सांगितले.

पक्षात आलेले नगरसेवक शिवसेनेचे असल्याचे नंतर मला समजले. त्यानंतर मी लगेच आमदार निलेश लंके यांच्याशी बोललो. ते पाच नगरसेवक भाजपामध्ये जाणार होते. राष्ट्रवादीत प्रवेश मिळत नसेल तर आम्ही भाजपामध्ये जाऊ, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यासाठी तुमच्याकडे आणले, अशी माहिती लंके यांनी दिली. त्यावर सत्तेत सोबत असलेल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची फोडाफोड करणे योग्य नाही, असे मी लंके यांना सांगितले, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

- Advertisement -

पक्षात अन्याय होत असल्याची भावना शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये होती. त्यावर तुमच्या समस्या तुमच्या पक्षप्रमुखांना सांगा. उद्धव ठाकरे त्या नक्कीच दूर करतील, असे आवाहन मी पाच नगरसेवकांना केले. त्यानंतर त्यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला आणि या सगळ्या गोष्टीवर पडदा पडला, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या राजकारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरेंच्या मनात कोणतीही नाराजी नसल्याचे अजित पवारांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -