गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही; नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना भरला दम

narayan rane

पक्षात गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही, असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला. सावंतवाडी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. पक्षात एकाला पद मिळालं म्हणून त्याला पाडायचा प्रयत्न करु नका. तुम्ही हक्काने मागा मी नक्कीच पद देईन. पण गद्दारी सहन करणार नाही, असा सज्जड दम राणेंनी कार्यकर्त्यांना भरला. तसंच, येणाऱ्या सावंतवाडी तालुका भाजपमय करण्यासाठी पक्षाचं काम तळगाळात पोहोचवा, अशा सूचना राणे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

नारायण राणे यांनी सावंतवाडी, कुडाळ विधानसभा तसंच लोकसभा आपल्या ताब्यात घेण्यासाठी तयारीला लागा, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. सावंतवाडी माझा आवडता तालुका आहे. पण, सावंतवाडी, कुडाळ आमदारांसह लोकसभेचा खासदार आपला नाही याचं शल्य आहे अशी खंत राणेंनी बोलून दाखवली.

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांवर टीका

नारायण राणे यांनी मुखअयमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. मी मुख्यमंत्री असताना मुंबईवर गुंडांची दहशत होती. पाकिस्तानातून मुंबईवर हल्ले होत होते; मात्र असं असताना ती दहशत मी मोडून काढली. आताच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यामध्ये ती धमक आहे का? असा सवाल त्यांनी राणेंनी केला.

केसरकर, वैभव नाईक यांच्यावर टीका

नारायण राणे यांनी आमदार दिपक केसरकर, वैभव नाईक यांच्यावर टीका केली. मी आमदार असताना विधानसभा गाजवली. एक इतिहास निर्माण केला. कोकणातील बुद्धिमत्ता कशी आहे, ही महाराष्ट्रातील आमदारांना दाखवून दिली. मात्र आताचे इथले आमदार नेमके काय बोलतात हेच समजत नाही. गावचा सरपंच सुद्धा इथल्या आमदारापेक्षा चांगला बोलतो. जिल्हा नियोजनमध्ये कोणते विषय केव्हा बोलायचे हे सुद्धा यांना माहीत नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.