मुंबई : ड्रग्जमाफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात रुग्णालयात फाइव्ह स्टार सोयीसुविधा पुरवल्या जात होत्या. यासाठी तो महिन्याकाठी तब्बल 17 लाख रुपये देत होता, असा दावा एका मराठी वृत्तवाहिनीने केला आहे. त्याचा संदर्भ देत महाराष्ट्र काँग्रेसने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.
हेही वाचा – दिलेल्या वेळेतच फटाके फोडून सहकार्य करा; आयुक्त चहल यांचे मुंबईकरांना आवाहन
मी पळालो नाही तर मला पळवून लावले, एवढेच नाही तर मी सगळ्यांची नावे सांगणार, असे ड्रग्जमाफिया ललित पाटील पोलिसांच्या ताब्यात असताना म्हणाला होता. आता त्याच्याच चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे तो अटकेत असतानाही ससून रुग्णालयात राहून पंचतारांकीत हॉटेलमध्ये जशा सुविधा मिळतात अगदी तशाच सुविधा त्याला तेथे मिळत होत्या. यासाठी तो 17 लाख रुपये महिन्याला देत होता.
अपयशी गृहमंत्र्याच्या सत्ताकाळात एका कुख्यात ड्रग्ज माफियाला कशी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात होती बघा… एक अट्टल गुन्हेगार 17 लाख रुपये देऊन ऐशोरामात वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली सरकारी रुग्णालयात राहत होता. सरकारमधील कोणीतरी रसद पुरवल्याशिवाय हे होऊ शकतं का? दिल्लीदरबारी जाऊन… pic.twitter.com/9CQfKsngMH
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 10, 2023
ललित पाटीलला 2020मध्ये पोलिसांनी अटक केली तेव्हा तो तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले होते. मात्र, आजारपणाचे कारण देत त्याने रुग्णालयातच मुक्काम ठोकला होता. यादरम्यान तो हवे तसे कुठेही फिरत होता. रुग्णालयातून पंचतारांकित हॉटेलमध्ये जात होता. पोलीस तपासात ललित पाटील याने ही माहिती दिल्याचे टीव्ही 9मराठीने म्हटले आहे. 16 नंबर वार्डात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तो पैसे देत होता, असे सांगण्यात येते. या प्रकरणात दहा पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. परंतु बडतर्फीची कारवाई अजून कोणावर झाली नाही.
हेही वाचा – रोहित शर्मा नाकारत होता कर्णधारपद पण…; गांगुलीने सांगितली ‘ती’ इनसाइड स्टोरी
यावरून महाराष्ट्र काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अपयशी गृहमंत्र्याच्या सत्ताकाळात एका कुख्यात ड्रग्ज माफियाला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात होती. एक अट्टल गुन्हेगार 17 लाख रुपये देऊन ऐशोरामात वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली सरकारी रुग्णालयात राहत होता. सरकारमधील कोणीतरी रसद पुरवल्याशिवाय हे होऊ शकतं का? दिल्लीदरबारी जाऊन मुजरा करण्यात वेळ घालवणारे निष्क्रिय गृहमंत्री याची सखोल चौकशी करणार का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.