घरमहाराष्ट्रBMC: आयुक्त इकबाल सिंह यांचे गॉडफादर कोण! बदली न झाल्यास केंद्रीय निवडणूक...

BMC: आयुक्त इकबाल सिंह यांचे गॉडफादर कोण! बदली न झाल्यास केंद्रीय निवडणूक आयोग देणार बदलीचे आदेश

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेत सुमारे पावणेचार वर्षे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहणार्‍या इकबालसिंह चहल यांनी प्रशासकाच्या भूमिकेत असल्यापासून मागील 2 वर्षात कधी नव्हे ते महापालिकेतील 15 खात्यांचे व विभागांचे प्रमुख अभियंता पद प्रभारीच ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. तसेच मंत्रालयात किंवा राज्य सरकारच्या सेवेतील सनदी अधिकार्‍यांना वेटिंगवर ठेवले जाते तशीच काही पद्धत सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांच्या बाबतीत मुंबई महापालिकेत सुरू केल्याने अधिकारीवर्ग काम बंद करण्याच्या तयारीत आहे.

हे नाराज अधिकारी लवकरच आपल्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी मांडणार असल्याचे महापालिका वर्तुळातून सांगण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर राज्यातील महत्वाच्या महापालिका, महामंडळांवरील २ डझन सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या गेल्या आठवड्यात केल्या होत्या. मात्र मुंबई पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या बदलीसाठी सरकारला मुहूर्त मिळत नसल्याने चहल यांचा गॉडफादर कोण, अशी चर्चा विधानभवनात सुरू होती.
आता उपायुक्त रमाकांत बिरादार यांची परिमंडळ 2 वरून बदली केल्यानंतर सध्या बिरादार यांना कोणताही पदभार दिलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिरादार हे जून 2024 मध्ये निवृत्त होत असतानाही 4 महिन्यांकरिता त्यांना पदभार न देणे कितपत योग्य आहे, असा सवाल एका ज्येष्ठ अधिकार्‍याने केला. तसेच सहआयुक्त असलेल्या रमेश पवार यांना निवृत्तीच्या 2 महिने अगोदर बदली करून अपमानास्पद वागणूक दिल्याची नाराजी अनेक उपायुक्तांमध्ये आहे. नगरविकास खाते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असूनही आयुक्त चहल महापालिका अधिकार्‍यांची गळचेपी करीत असतील तर याला जबाबदार कोण, असा सवाल माजी आयुक्त आणि माजी मुख्य सचिव असलेल्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने आपलं महानगरशी बोलताना केला. मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक असल्याने कामाचा व्याप असणार. त्यात सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांना पदभार न देणे म्हणजे एकप्रकारे अधिकारांचा गैरवापरच आहे. तसेच मर्जीतील अधिकार्‍यांकडे एकापेक्षा जास्त खात्यांचा पदभार देताना दुसरीकडे काहींना कामच द्यायचे नाही याला काय म्हणायचे, असा उद्विग्न सवालही त्या मुख्य सचिवाने केला.

- Advertisement -

पावणेचार वर्षे मुंबई महापालिकेतच

तब्बल पावणेचार वर्षे होऊनही चहल यांना मुंबई महापालिका सोडवत नाही. चहल यांनी मे 2020 मध्ये ऐन कोरोना काळात तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तंबीनंतरही नगरविकास खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चहल यांची बदली करीत नसतील तर दिल्लीतील निवडणूक आयोगालाच येत्या आठवड्यात चहल यांच्या बदलीचे आदेश काढावे लागतील, असे एका माजी मुख्य सचिवाने आपलं महानगरशी बोलताना सांगितले. याबाबत तत्कालीन राज्य निवडणूक आयुक्त नंद लाल यांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना काही अधिकार्‍यांना तात्काळ पदमुक़्त करावे, अशा सूचना राज्य सरकारला केल्याची आठवणही या वरिष्ठ अधिकार्‍याने करून दिली.
मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या 15 पदांवर अद्यापही कायम प्रमुख अभियंत्यांची निवड केलेली नाही. त्यामुळे महत्त्वाची अशी प्रमुख अभियंत्यांची सर्वच पदे रिक्त आहेत. या पदांचा तात्पुरता भार हा उपप्रमुख अभियंत्यांवर सोपवलेला आहे. इकबालसिंह चहल हे जाणीवपूर्वक आपल्या काही मर्जीतील अभियंत्यांवर प्रभारी प्रमुख अभियंतापदाचा भार सोपवून आपल्याला हवे तसे कामकाम करून घेत असल्याचा आरोप एका वरिष्ठ उपप्रमुख अभियंत्याने केला.

विकास व नियोजन विभाग, इमारत देखभाल विभाग, नगर अभियंता, नागरी प्रशिक्षण केंद्र, रस्ते व वाहतूक विभाग, कोस्टल रोड, पूल विभाग, यांत्रिक व विद्युत विभाग, पर्जन्य जलवाहिनी, जलअभियंता विभाग, पाणी पुरवठा प्रकल्प, मलनि:सारण प्रकल्प, मुंबई मलनि:सारण प्रकल्प, मलनि:सारण प्रचालन, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख अभियंता पदे दीड वर्षापासून रिक्त आहेत, पण जर अधिकार्‍यांची कायम नेमणूक केल्यास संबंधित अधिकारी वरिष्ठ अधिकार्‍यांचे ऐकत नाही किंवा नियमांवर बोट ठेवून काम करतो. त्यामुळे ही पदे न भरता प्रभारींकडे सोपवली जातात. त्यामुळे बरेच प्रभारी प्रमुख अभियंता हे अधिकार्‍यांची मर्जी राखण्यासाठी आणि त्यांना खूश ठेवून आपले पद कायम राखण्याचा प्रयत्न करतात, असेही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

प्रभारी प्रमुख अभियंता पदावरील अधिकारी

विकास व नियोजन विभाग : सुनील राठोड

इमारत देखभाल विभाग : यतीन दळवी

नगर अभियंता : दिलीप पाटील

नागरी प्रशिक्षण केंद्र : सुनील भाट

रस्ते व वाहतूक विभाग : मनिष पटेल

कोस्टल रोड : मांतय्या मल्लया स्वामी

पूल विभाग : विवेक कल्याणकर

यांत्रिक व विद्युत विभाग : कृष्णा पेरेकर

पर्जन्य जलवाहिनी : रिक्त

जलअभियंता विभाग : पुरुषोत्तम माळवदे

पाणी पुरवठा प्रकल्प : पांडुरुंग बंडगर

मलनि:सारण प्रकल्प : रिक्त

मुंबई मलनि:सारण प्रकल्प : अशोक मेंगडे

मलनि:सारण प्रचालन : प्रदीप गवळी

घनकचरा व्यवस्थापन : प्रशांत तायशेटे

हेही वाचा : Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -