घरमहाराष्ट्र'शरद पवार पंतप्रधान होणार असतील तर शिवसेनेचा पाठिंबा असेल!'

‘शरद पवार पंतप्रधान होणार असतील तर शिवसेनेचा पाठिंबा असेल!’

Subscribe

एकीकडे शरद पवार निवडणूक लढवणार की नाही यावर चर्चा सुरू असतानाच आता पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेनेचा पाठिंबा असेल, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २०१९ची लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? यावर सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खुद्द पवारांनीच तसे संकेत दिल्यामुळे तर या चर्चेला आणखीनच धार आली आहे. काही राजकीय जाणकारांच्या मते शरद पवारांनी निवडणूक लढवली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोडीचे नेते म्हणून पंतप्रधान पदाच्या संभाव्य उमेदवारीसाठी शरद पवारांचं नाव पहिल्या क्रमांकावर असेल. त्यामुळे आता शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या अवती-भवती राजकीय आडाखे बांधायला सुरुवात झाली असून ‘जर शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, तर त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असेल’, अशी भूमिका मांडली जात आहे. आणि ही भूमिका मांडली आहे ती एकेकाळी शिवसेनेचे आक्रमक नेते असलेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारातले प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी!

पवार पुन्हा प्रचाराच्या रणधुमाळीत?

काही दिवसांपूर्वीच बारामतीमध्ये शरद पवारांनी निवडणूक लढवण्याबद्दल सूचक वक्तव्य केलं होतं. ‘मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी बहुतेक सर्वच वरीष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मी त्याचा विचार करीन’, असं पवार म्हणाले होते. त्यामुळे २००९च्या निवडणुकांनंतर ‘मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही’, असं म्हणणारे शरद पवार पुन्हा एकदा प्रचाराच्या रणधुमाळीत दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

वाचा काय म्हणतायत पवार – मला नितीन गडकरींची काळजी वाटतेय

पवारांची उमेदवारी राजकीय गणितं घडवणार की बिघडवणार?

या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी महाआघाडीमध्ये विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देईल असं प्रमुख नेतृत्व म्हणून शरद पवार यांचं नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि महाआघाडीतल्या इतर सर्व पक्षांची राजकीय गणितं कशी फिरतात? हे सर्वात महत्त्वाचं ठरणार असून देखील, जर पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आले, तर काय होईल? याचे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

भुजबळांनी केली शिवसेनेची भलामण!

रविवारी नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी ठाकरे सिनेमा पाहिल्यानंतर शिवसेनेची भलामण केली. ‘बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना संपेल असं बोललं गेलं, पण शिवसेना उभी राहिली. बाळासाहेबांचा वारसा उद्धव ठाकरे चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत’, असं भुजबळ यावेळी म्हणाले. मात्र, त्याचवेळी ‘जर शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना त्यांना नक्कीच पाठिंबा देईल’, असं भुजबळ म्हणाले. त्यामुळे भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळलेली शिवसेना भविष्यात एखादा क्रांतीकारी निर्णय घेण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -