घरमहाराष्ट्रशिंदे गट मनसेत विलीन झाल्यास नेमका फायदा कोणाला?, समजून घ्या गणित

शिंदे गट मनसेत विलीन झाल्यास नेमका फायदा कोणाला?, समजून घ्या गणित

Subscribe

हाच धागा पकडत काल एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं बोललं जातंय. मात्र, मनसे किंवा शिंदे गटाने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून आहे.

मुंबईः एकनाथ शिंदेंच्या बंडानं राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. विशेष म्हणजे ही लढाई आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलीय. शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अपात्रतेच्या नोटिशीला आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंशी कालपासून दोनदा चर्चा केल्याचं वृत्त समोर आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा गट मनसेत विलीन होणार का?, अशीच चर्चा रंगू लागलीय.

शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये थांबलेत, जिथे त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विलीन होऊ शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना बंडखोरांचे भाजप किंवा प्रहार पक्षात विलीनीकरण झाल्यास त्यांचा स्वतःच्या अस्मितेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसा संपुष्टात येईल. तर मनसेच्या विलीनीकरणामुळे बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व या दोघांनाही पाठिंबा मिळेल. हाच धागा पकडत काल एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं बोललं जातंय. मात्र, मनसे किंवा शिंदे गटाने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून आहे.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्यासाठी शिंदे गटाला मनसे हा उत्तम पर्याय आहे. बाळासाहेबांचा वारसा आणि विचारांशी प्रतारणा करणार नसल्याचं एकनाथ शिंदेंनी आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळे ते भाजपा किंवा इतर पक्षात विलीनीकरण करण्यापेक्षा हिंदुत्ववादी विचारसरणीवर उभ्या असलेल्या मनसेत विलीन होणे शिंदेंच्या गटासाठी फायद्याचं ठरू शकतं. तसेच राज ठाकरेंच्या माध्यमातून बाळासाहेब ‘ठाकरे’ नावाशीही जवळीक साधता येऊ शकते आणि हिंदुत्ववादी विचारांसाठी राज ठाकरेंशी हातमिळवणी केल्याचा मेसेजही जनतेत जाईल. शिंदे गटाच्या माध्यमातून शिवसेनेपासून दुरावलेल्या भाजपलाही मनसेच्या रूपात चांगला पर्याय मिळेल. पण राज ठाकरेंनी अद्यापही आपले पत्ते उघड केलेले नाहीत. शिवसेनेतील बडव्यांना कंटाळून बाहेर पडलेल्या राज ठाकरेंनी मनसेच्या पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार निवडून आणले होते. पण नंतरच्या निवडणुकीत त्यांना फारसा करिष्मा दाखवता आला नाही. नाशिक महापालिकेत आलेली सत्तासुद्धा त्यांना गमवावी लागली. परंतु शिंदे गटाच्या रुपानं एका झटक्यात राज ठाकरेंच्या मनसेत 42 आमदार सहभागी होतील. त्यामुळे मनसेलाही एक प्रकारची ताकद मिळेल. सत्तेत असल्यानं मनसेलाही राज्यभरात आपला पक्ष वाढवता येईल. अडीच वर्षात मनसे शिवसेनेपेक्षा मजबूत पक्ष म्हणून नावारुपाला येऊ शकतो.

विशेष म्हणजे शिवसेनेनंही मनसेचे सात नगरसेवक फोडले होते. याचा वचपाही राज ठाकरेंना या निमित्ताने काढता येईल. दिलीप लांडेंना फोडून शिवसेनेनं मनसेला धोका दिला होता, आज तेच दिलीप लांडे शिंदे गटात असल्यानं राज यांची हरवलेली ताकद त्यांना पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे सोबत नसले तरी राज ठाकरे असतील. एक ठाकरे आपल्यासोबत असल्यानं बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वही हे दोन्ही मुद्दे त्यांना वापरता येतील. शिंदे गटासाठी यासारखी चांगली संधी दुसरी असू शकणार नाही. भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसोबत गेल्याचं बंडखोरांच्या गटाला जनतेला सांगता येईल. दोन तृतीयांश आमदारांनी एकत्र येऊन वेगळा गट स्थापन केल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास त्यांची आमदारकी शाबूत राहते. त्यामुळे आता बंडखोर आमदारांच्या गटाने मनसेमध्ये प्रवेश केला तर त्यांची आमदारकी कायम राहणार आहे.

- Advertisement -

शिवसेनेनं मनसेचे नगरसेवक फोडल्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणावर आपण विश्वास ठेवत नसल्याचंच राज ठाकरेंनी सांगितलं होतं. तसे संस्कार आपल्यावर झालेलं नसल्याचंही राज ठाकरेंनी याआधी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला राज ठाकरे मनसेत प्रवेश देणार का? हे काही दिवसांतच समजणार आहे.


हेही वाचाः एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंशी केली दोनदा फोनवर चर्चा, राजकीय चर्चांना उधाण

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -