घरमहाराष्ट्रवेडावाकडा निर्णय घेतला तर न्यायालयात जाणार

वेडावाकडा निर्णय घेतला तर न्यायालयात जाणार

Subscribe

उद्धव ठाकरे यांचा विधानसभा अध्यक्षांना इशारा, आमदार अपात्रतेवर २ आठवड्यात निर्णय घेण्याची मागणी

आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो पोपट ठेवला आहे तो निश्चल आहे, तो मेलेला आहे, हे जाहीर करण्याचे काम विधानसभा अध्यक्षांकडे सोपविले आहे. त्यामुळे सरकारला मिळालेले जीवदान हे तात्पुरते आहे. वाजवी वेळ यालादेखील मर्यादा असल्याने अध्यक्ष आपल्या परीने निर्णय घेतीलच, पण त्यांनी जर काही वेडावाकडा निर्णय घेतला, तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. मग त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांना परत मुख्यमंत्री करता आले असते, असे न्यायालयाने म्हटले आहे. याचा अर्थ हे सरकार बेकायदेशीर आहे. मी माझ्यातील नैतिकतेला जागून राजीनामा दिला. ज्यांना मी आणि बाळासाहेबांनी भरभरून दिले, त्या विश्वासघातक्यांनी अविश्वास दाखवावा हे मला चालणार नव्हते. अशा विश्वासघातक्यांचे प्रमाणपत्र घेऊन मला पदावर राहायचे नव्हते. त्यामुळे मी आजही माझ्या निर्णयावर समाधानी आहे. आता लोकशाहीत जनतेचे न्यायालय हे शेवटचे असते. त्यामुळे याचा फैसला करण्यासाठी आता जनतेकडे जाऊ आणि जनता जो निकाल देईल तो स्वीकारू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. ही मागणी करताना न्यायालयाच्या निर्णयावर फटाके फोडून आनंद व्यक्त करणार्‍या शिंदे गटावर ठाकरे यांनी आपल्या शैलीत टीका केली. एकनाथ शिंदे सरकारचे नाव न घेता मेलेला पोपट जाहीर करण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला. शिंदे सरकार बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्याने जगात महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे. ती अधिक होऊ नये हीच आमची अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. न्यायालयाने सरकारची लक्तरे काढल्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.

राज्यात सुरू असलेल्या बेबंदशाहीवर न्यायालयाने परखड भाष्य केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना मराठी माणसासाठी, हिंदूंच्या रक्षणासाठी जपली आहे. अशी शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून आपल्या दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला आहे. न्यायालयाने हिंदुत्वाच्या बुरख्याखालचा भेसूर चेहरा उघडा पाडला आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे प्रतोदपद बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आधीच्या म्हणजे माझ्या शिवसेनेचाच व्हिप लागू होणार आहे. अध्यक्षांनी वेडावाकडा निर्णय घेतला तर आम्हाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायलयात गेलो आहोत. त्याच धर्तीवर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ. मग सरकारच्या होणार्‍या बदनामीला नार्वेकर जबाबदार असतील, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.

नार्वेकर यांनाच पायउतार व्हावे लागेल : अनिल परब

अपात्र होणार्‍या आमदारांच्या मतांवर विधानसभा अध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही पायउतार व्हावे लागेल. कारण परिशिष्ट १०च्या विरोधात अध्यक्षांनी काम केले आहे, असा दावा ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी यावेळी केला. राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतोदपदाची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे, तसेच अपात्रतेची कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या कार्यवाहीदरम्यान ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हिप लागू होणार असून ही प्रक्रिया लवकर सुरू करावी म्हणून अध्यक्षांना पत्र देणार असल्याचे परब म्हणाले.

सुनील प्रभूंचा व्हिप सर्व सदस्यांना लागू होतो तसेच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदाची निवडही बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाले असून या बाबीवर न्यायालयाच्या निकालाने शिक्कामोर्तब केले आहे. अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड न्यायालयाने योग्य ठरवली आहे. यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्यांनी निकालात दिरंगाई करू नये. कारण सर्व रेकॉर्ड विधानसभा सचिवालयाकडे उपलब्ध आहे. निकालास उशीर झाल्यास आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा अनिल परब यांनी यावेळी दिला.

निवडणुकीची खुमखुमी असेल तर राजीनामा द्या! – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता ठाकरे गटाकडून नैतिकतेच्या गप्पा मारल्या जात आहेत, मात्र नैतिकता शिल्लक असेल तर ठाकरे गटात उरलेल्या शिवसेना आणि भाजपच्या एकत्रित मतांवर निवडून आलेल्या आमदारांनी आधी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी दिले. ठाकरे गटाचे उरलेले आमदार, खासदार शिवसेनेत येणार आहेत. त्यांना थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवून संभ्रम पसरवला जात आहे, असा आरोपही डॉ. शिंदे यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षाकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि अ‍ॅड. निहार ठाकरे यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्ला चढवला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे वाचन करीत डॉ. शिंदे यांनी ठाकरे गटाने न्यायालयाकडे केलेल्या आठपैकी सहा मागण्या फेटाळल्याची माहिती दिली.

नैतिकतेच्या गप्पा करणार्‍यांनी २०१९ मध्ये भाजपसोबत निवडणूक लढवली. एकत्रितपणे लोकांसमोर गेले. बॅनरवर फोटो लावले आणि युतीत निवडून आले, पण त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिसायला लागली. त्यासाठी दुसर्‍यासोबत संसार थाटला गेला. त्यामुळे नैतिकता असती तर दुसर्‍यांसोबत सरकार स्थापन केले नसते, अशी टीका डॉ. शिंदे यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात विधानसभा अध्यक्षांची निवड वैध ठरवली आहे. त्यांना अपात्रतेच्या मुद्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत, मात्र आता काही जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापेक्षा मोठे झाले आहेत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. उद्धव ठाकरे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होते, मात्र ते स्वतः मुख्यमंत्रीपदावर बसले. निवडणुकीआधी केलेली युती नंतर तोडली ती नैतिकता होती का? ती जनतेसोबत गद्दारी नव्हती का, असा सवालही त्यांनी केला.

यावेळी डॉ. शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे वाचन करीत त्याचा अर्थ सांगितला. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यांच्या आठपैकी सहा मागण्या फेटाळून लावल्या आहेत. ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली ते कामकाजात सहभागी होऊ देऊ नका, अशी त्यांची मागणी होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती नाकारली. ते विधानसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. अध्यक्षांनी चौकशी करून निर्णय घेण्यास न्यायालयाने सांगितले आहे. तरीही सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करण्याचे, नागरिकांची दिशाभूल करण्याचे आणि नागरिकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटे बोलण्याचे काम केले जात आहे. खोटी माहिती पसरवली जात आहे, असा आरोप डॉ. शिंदे यांनी ठाकरे गटावर केला.

ठाकरे गट जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. निकालाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार पडणार म्हणून सातत्याने खोटे पसरवले जात असून आपल्या बाजूने सहानुभूती मिळावी यासाठी हे खोटे बोलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ज्यांना निवडणुकांची हौस आहे त्यांनी राजीनामा द्यावा. शिवसेना-भाजप युतीला ४६ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे खरंच नैतिकता असेल तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा आणि निवडणुकांना सामोरे जावे. त्यावेळी लोक कुणाच्या बाजूला उभे आहेत ते तुम्हाला कळेल, असा टोलाही डॉ. शिंदे यांनी यावेळी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -