थोडी तरी लाज शिल्लक असेल तर…, खताच्या मशीनवरून मिटकरींचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यात आधीच संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे अस्मानी संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीने विधिमंडळ अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खताच्या मशीनवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. आजच्या सरकारमध्ये शेतकरी दुय्यम झाला आहे. ते आज स्मार्ट सिटी आणि मेट्रोत व्यस्त झाले. मात्र ही शहर मोठी झाली ती शेतकऱ्याच्या कष्टामुळे, हे विसरुन चालणार नाही. आमचे सरकार ज्यावेळी सत्तेत होते, त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि खर्चाचा विचार न करता मदत करण्याचे काम केले, अशा शब्दांत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

तर, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे राज्यात ‘ईडी’ सरकार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात विजेचे दर वाढवले जात आहेत. खते, बी-बियाणांचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. मात्र त्याला न्याय देताना हे सरकार दिसत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तर, सर्वच उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले आहेत आणि काचा फुटलेल्या एसटीवर लिहिलेले असते की गतिमान महाराष्ट्र. तरुणांचे रोजगार गेले. शेतकरी हवालदिल आहे. असे असताना लाज नाही वाटत गतिमान महाराष्ट्र म्हणायला, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेडच्या सभेत केली.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खताच्या मशीनचा मुद्दा उपस्थित करत, थोडी तरी लाज शिल्लक असेल तर कृषिमंत्री यावर खुलासा देईल, असे म्हटले आहे. अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर हॅण्डलवरून एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर, ‘खताच्या मशीनसाठी नवीन अपडेट आले, ज्यात शेतकरी हा कोणत्या जातीचा आहे, अशी विचारणा केली जात आहे. शेतकरी फक्त शेतकरी असतो. या सरकारला यातून काय सिद्ध करायचे आहे? याबाबत सरकारने खुलासा करावा. थोडी तरी लाज शिल्लक असेल तर कृषिमंत्री यावर खुलासा देईल, असे ट्वीट त्यांनी केले आहे.