घरCORONA UPDATEस्वत:ला वाचवाल तर देश वाचेल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पत्राद्वारे...

स्वत:ला वाचवाल तर देश वाचेल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पत्राद्वारे आवाहन

Subscribe

नागरिकांनी संयम राखून कोरोनावर मात करावी. स्वतःला वाचवाल तर देशाला वाचवाल.

देवीदास आबुज, पारनेर


कोरोनाचे संकट हे भयानक आहे. त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती ही एखाद्या युद्धासारखी आहे. नागरिकांनी संयम राखून कोरोनावर मात करावी. स्वतःला वाचवाल तर देशाला वाचवाल. त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन करताना हजारे यांनी म्हटले आहे की, सर्वांनाच माहीत आहे की, सध्या संपूर्ण जग हे कोरोना व्हायरसच्या सावटाखाली आहे. आजपर्यंत जगातील ६ लाखाहून अधिक लोक कोरोनाबाधित आहेत. तर २८ हजाराहून अधिक मृत्यु झाले आहेत. हे आकडे सातत्याने वाढत असून एकंदर हे संकट भयानक स्वरुपाचे असल्याने त्याचे गांभिर्य जनतेने समजून घेणे गरजेचे आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहेत. प्रशासन आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत देशभर लॉकडाऊन घोषित केले आहे. महाराष्ट्र सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलिस सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

- Advertisement -

या परिस्थितीत सर्वात मोठी जबाबदारी ही नागरिकांची आहे. हा एक प्रकारे युद्धाचा प्रसंग आहे हे ध्यानात घ्यावे. सर्वच युद्धे ही काही रणांगणावर लढली जात नाहीत. सध्याच्या परिस्थितीत संयम महत्त्वाचा असल्याचे सांगत आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग हा एका व्यक्तीच्या संपर्कातून दुसऱ्या व्यक्तीला होतो. इटली, स्पेन, अमेरिका या प्रगत देशांची अवस्था पाहिली तर भारतातील जनतेने खडबडून जागे होण्याची ही वेळ आहे. कारण आपल्याकडे लोकसंख्येच्या तुलनेत साधन-सुविधांची खूप मोठी कमतरता आहे. अशा वेळी संपूर्ण खबरदारी घेतली नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते अशी भीतीही हजारे यांनी व्यक्त केली आहे.

Screenshot_2020-03-29-15-44-37-90_f541918c7893c52dbd1ee5d319333948
अण्णा हजारे यांचे पत्राद्वारे आवाहन

राज्यातील व देशातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व लोक हे या जीवघेण्या परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना वाचविण्याची शिकस्त करीत आहेत. तसेच पोलिस आणि प्रशासनातील लोकही रात्रंदिवस मेहनत घेऊन परिस्थिती हाताळीत आहेत. या सर्वांना मनापासून धन्यवाद. देशातील व राज्यातील सर्व बंधू-भगिनींना विनंती आहे की, सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. तुम्ही स्वतःला वाचवलेत तर देश आपोआप या संकटातून वाचणार आहे. जे दानशूर व सक्षम लोक आहेत त्यांनी आपापल्या परीने या संकट काळात उदार अंतःकरणाने सहकार्य करण्याची हीच वेळ आहे. सर्वांना या संकटावर मात करण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना हजारे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -