इगतपुरी रेव्ह पार्टी : नायझेरियन तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात; ड्रग्जच्या शोधार्थ पोलिसांचे पथक मुंबईत दाखल

इगतपुरीत सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर रविवारी (दि.२७) पहाटे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी कोकेन ड्रग्जसह इतर अमली पदार्थ व रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी एक विदेशी महिला, मराठी व दक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या पाच अभिनेत्री, २ कोरियोग्राफर महिलांसह २२ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे. पार्टीसाठी अमली पदार्थ कोठून आणले. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईमधून नायजेरियन नागरिकास चौकशी ताब्यात घेतले आहे. त्यास पोलीस तपासाठी इगतपुरीत आणले आहे.

इगतपुरीतील दोन बंगल्यांमध्ये उच्चभ्रू वस्तीतील पुरुष व महिला अवैधरित्या पार्टी करत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्काय ताज व्हीला व स्काय लगून व्हीला येथे छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी ड्रग्ज व हुक्क्याचे सेवन करताना मद्यधुंद अवस्थेत २२ जण आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन केकेन इतर अंमली पदार्थ जप्त केले. या पार्टीत इराणची एक महिला, चित्रपट क्षेत्रातील पाच महिला सहभागी असल्याचे समोर आले. त्यात बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतले. यामध्ये १० पुरुष व १२ महिलांचा समावेश आहे.शिवाय पोलिसांनी स्काय ताज व्हीला व स्काय लगून व्हीला येथील कर्मचार्‍यांना ताब्यात घेतले आहे.