रेव्ह पार्टी : ड्रग्ज पुरवठादार नायजेरियन तरुण तुरुंगातच

इगतपुरीत सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह ग्रामीण पोलिसांनी २७ जून २०२१ रोजी पहाटे पर्दाफाश केला होता. या पार्टीत ड्रग्ज पुरवणार्‍या फरार असलेल्या नायजेेरियन तरुणाला पोलिसांनी मुंबईत अटक केली होती. उमाही पिटर नाव असलेला हा तरुण आजही तुरुंगातच आहे.

इगतपुरीतील दोन बंगल्यांमध्ये उच्चभ्रू वस्तीतील पुरुष व महिला रेव्हपार्टी करत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी स्काय ताज व्हीला व स्काय लगून व्हीला येथे छापा टाकला होता. छाप्यात पोलिसांनी ड्रग्ज व हुक्क्याचे सेवन करताना मद्यधुंद अवस्थेत २२ जण आढळून आले. या पार्टीत इराणची एक महिला, बिग बॉस फेम हिना पांचालसह चित्रपट क्षेत्रातील पाच महिला सहभागी असल्याचे समोर आले. पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतले. यामध्ये १० पुरुष व १२ महिलांचा समावेश होता. रेव्ह पार्टीसाठी अमली पदार्थ कुठून आणले, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले होते. पोलिसांनी पिटरला मुंबईतून अटक करत इगतपुरीत आणले. चौकशीत तो ड्रग्ज पुरवठादार असल्याचे समोर आले. न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली होती.