महिला दिनीच महिला आमदारांची उपेक्षा, सभागृहात अनेक सदस्य गैरहजर

Maharashtra Assembly Budget Session 2023 | सभागृहात अनेक सदस्यही उपस्थित नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महिला दिनी महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Maharashtra Assembly Budget Session 2023 | मुंबई – आज जगभर महिला दिन साजरा होतोय. कर्तृत्वान महिलांचा गौरव आजच्या दिनी केला जातोय. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आजची लक्षवेधी खास महिला आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आज महिला धोरणाविषयी महिला आमदार सभागृहात चर्चा करत असताना सभागृहात अनेक सदस्य अनुपस्थित आहेत. त्यामुळे महिला दिनी महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

महिला दिनानिमित्त आज राष्ट्रीय महिला धोरणाचा ठराव मांडला जाणार आहे. ठरावाबाबत विधानसभेत महिला आमदारांनी महिलांच्या विविध समस्या मांडल्या. प्रत्येक मतदारसंघात महिलांच्या विविध समस्या आहेत. तसंच, राष्ट्रीय पातळीवर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. त्या अनुषंगाने या समस्यांचा विचार महिला धोरण आखताना करण्यात यावा, अशी सामायिक विनंती महिला आमदारांकडून करण्यात आली. परंतु, खेदजनक म्हणजे महिला दिनीच महिलांची उपेक्षा केली जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण, विधानसभेत महिला चर्चा करत असताना सभागृहातृ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच पुरुष आमदार सभागृहात उपस्थित आहेत. त्यामुळे महिलांच्या प्रश्नांना कमी लेखलं जात असल्याचा सूर राजकीय वर्तुळातून आळवण्यात येत आहे.

२८८ सदस्य संख्या असलेल्या विधिमंडळात अवघ्या २५ ते २७ महिला आमदार आहेत. यातील अनेक महिला आमदारांना सभागृहात बोलण्याची संधी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न प्रलंबित राहतात. तसंच, मंत्रिमंडळातही महिलांना स्थान न दिल्याने अनेक महिला आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यातच, आज महिला धोरण ठरावावर चर्चा सुरू असतानाच फक्त ३० ते ४० टक्के सदस्य संख्या सभागृहात उपस्थित असल्याचं समोर आलं.

“पुढच्या वेळेस एक महिला आमदार बोलत असेल तर इतर उरलेले २८७ आमदार बाकं वाजवताना दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त करते. महिला दिनी ३० ते ४० टक्के उपस्थित आहे,” असं आमदार आदिती तटकरे यांनी त्यांच्या चर्चेदरम्यान सांगितलं.