Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र IMD : मुंबईकरांनो छत्र्या काढा, आज रिमझिम सरी; काही जिल्ह्यांत तुफान पाऊस

IMD : मुंबईकरांनो छत्र्या काढा, आज रिमझिम सरी; काही जिल्ह्यांत तुफान पाऊस

Subscribe

 

मुंबईः मुंबई, ठाण्यात रिमझिम पाऊस तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता IMD हवामान खात्याच्या मुंबई विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ऊन्हाच्या झळा सहन करत असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यताच हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

मुंबईसह अनेक उपनगरात पुढील २४ तास ढगाळ वातावरण राहिल. संध्याकाळी किंवा रात्री रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रिमझिम पाऊस झाला तरी वातावरणात गारवा राहणार नाही. तापमानात घट होणार नाही. ३४ ते २८ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

काही जिल्ह्यांना मात्र IMD ने खुशखबर दिली आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यातील काही भागात ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. तर नाशिक आणि जळगावमध्ये पुढील ३ ते ४ तासांत गारपीट होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांतील नागिरकांना खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

जळगावमध्ये दुपारी १२ च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट झाल्याने येथे भितीचे वातावरण होते. भयंकर वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होते. सकाळी कडाक्याचे ऊन आणि दुपारी अचानक पाऊस सुरु झाला. नागरिकांची दाणादाण उडाली.

धुळे शहरातही पावसाने रविवारी सकाळी हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारा पडल्या. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री तालुक्यांतील काही भागांत गारांसह जोरदार पाऊस झाला. याचा फटका पिकांना बसला आहे. अनेकांनी कांदा काढून ठेवला आहे. कांदा खराब होण्याची शक्यता आहे.

मान्सून केरळच्या किनारपट्टीवर

मान्सून ४ किंवा ५ जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला होता. मान्सूनची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत आहे, खासकरून शेतकरी. कारण जून महीना सुरू झाला तरी नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मुंबई कमाल तापमान 35 अंशांवर आहे, तर राज्यातील काही भागात पारा 40 अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे उष्णतेमुळे त्रासलेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केरळच्या किनाऱ्यापासून मान्सून केवळ 400 किमीवर आहे. सध्या मान्सून दक्षिण अरब सागर, मालदीव, कोमोरिन क्षेत्रात असून दक्षिण बंगालची खाडी व पूर्व मध्य बंगाल खाडीत मान्सूनची आगेकूच सुरू आहे. ४ किंवा ५ जूनला मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. मान्सून उशीरा येत असल्यामुळे जुनच्या पहिल्या आठवड्यात गती कमी असेल, मात्र दुसऱ्या आठवड्यात वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार मान्सून कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ईशान्येतील सात राज्यांत दिसून येईल.

उष्णतेची लाट आवश्यक

जमिनीतील आर्द्रता संपून ती मान्सूनला आकर्षित करण्यासाठी मान्सूनपूर्व हंगामात उष्णतेची लाट आवश्यक असते. परंतु यावर्षी मार्च आणि मेदरम्यान 12 टक्के पाऊस पडल्यामुळे तसे होऊ शकले नाही. यावर्षी सर्वाधिक १३६ टक्क्यांहून जास्त पाऊस मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्रामध्ये पडला. त्यामुळे पश्चिम बंगाल, बिहार व झारखंड वगळता देशातील उर्वरित भागात एप्रिल-मेदरम्यान उष्णतेची लाट दिसून आली नाही.

 

- Advertisment -