राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्याच्या अनेक भागांत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. मंगळवारीही पावसाचा जोर कायम असल्याने राज्यातील काही भागांत हवामान विभागाकडून रेड अलर्ट (IMD red alert) जारी करण्यात आला आहे.

राज्याच्या अनेक भागांत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. मंगळवारीही पावसाचा जोर कायम असल्याने राज्यातील काही भागांत हवामान विभागाकडून रेड अलर्ट (IMD red alert) जारी करण्यात आला आहे. तसेच, मुंबईसह कोकणातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु असून पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. (IMD red alert to sindhudurg ratnagiri mumbai kolhapur and satara)

हवामान विभागाकडून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुबंईसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि साताऱ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात तीव्र हवामानाचा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुढील ४ ते ५ दिवस राज्यात सगळीकडे पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्रसह इतर भागातही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, विदर्भातील काही जिल्ह्यांना येला अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या भागात आपत्ती व्यवस्थापन विभागसह प्रशासन सज्ज झाले आहे. या परिसरात एनडीआरएच्या तुकड्याही मागवण्यात आल्या आहेत.

मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस, दक्षिण मराठवाड्यात काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही आज काही ठिकाणी चांगला पाऊस अपेक्षित आहे.

मुंबई आणि उपनगरांत सोमवारी सायंकाळपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह कोकणातही कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं नद्यांना पूर आला आहे. राजापूर, खेड, चिपळूण या भागांतही जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याने प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाला भेट दिली. अधिकाऱ्यांकडून पावसाचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, तिकडच्या नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्यात आले आहे. त्यानुसार जवळपास ३ हजार ५०० नागरिकांना सुरक्षास्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच, दरड कोसळणाऱ्या भागातीलही नागरिकांनी सुरक्षस्थळी हलवण्यात आले आहे. त्यामुळे कुठेही जीवितहानी होणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


हेही वाचा – मुंबईत कुठेही पाणी साचलेले नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा