न ढोलताशे, न मिरवणूक… साधेपणाने होणार ‘बाप्पा’चे विसर्जन!

अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन होते. आज, मंगळवारी राज्यभरातील गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. मात्र कोरोना संकटाच्या काळात सर्वच सण, उत्सव साधेपणाने साजरा होत असताना गणेश विसर्जनदेखील साध्या पद्धतीने केले जाणार आहे. यंदा राज्य सरकारने आखून दिलेल्या नियम-अटींनुसार गणरायाची कमी उंचीची मूर्ती सर्व सार्वजनिक मंडळांमध्ये ठेवण्यात आली आहे. तसेच भाविकांनी त्यांच्या जवळील कृत्रिम तलावात किंवा घरीच बाप्पाचे विसर्जन करावे, असे आवाहनही सरकारने केले आहे. शिवाय, पालिका, स्थानिक प्रतिनिधींच्या वतीनेही गणरायांना एकत्र घेऊन सामुहिक विसर्जन केले जाणार आहे. त्यामुळे दरवर्षी होणारा उत्सव, मिरवणूक, ढोलताशांचा आवाज यंदा बाप्पाला निरोप देताना नसणार आहे. अत्यंत साधेपणाने या वर्षी आपल्या लाडक्या गणराया भाविक निरोप देणार आहेत.

मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने विशेष काळजी घेण्यात आली असून शहरात ३५ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकीला बंदी असून दुपारी १२ ते उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत ५४ रस्ते अन्य वाहतुकीसाठी बंद घालण्यात आली आहे. तसेच ९९ जागांवर पार्किंगला बंदी असून ५६ रस्त्यांवर फक्त एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. दरम्यान, शहरात ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

हेही वाचा –

मंदिर प्रवेशासाठी रामदास आठवले यांचे राज्यभर आंदोलन