घरताज्या घडामोडीदीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात विसर्जन, ५२ हरतालिकांचे विसर्जन

दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात विसर्जन, ५२ हरतालिकांचे विसर्जन

Subscribe

मुंबई: मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे गणेशोत्सव व अन्य सण, उत्सव कोणालाही साजरे करता आले नाही. मात्र महिन्यापूर्वी राज्यात राजकीय भूकंप होऊन सत्तानंतर झाले आणि भाजप – एकनाथ शिंदे ( शिवसेना बंडखोर गट) गटाच्या युतीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा सण व उत्सव यांवरील निर्बंध हटवले. त्यामुळे यंदा दहीहंडीनंतर गणेशोत्सव धुमधडाक्यात व जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. श्रीगणेश चतुर्थीला आगमन झालेल्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे गुरुवारी वाजतगाजत, नाचत, गुलाल उधळत आणि जंगी विसर्जन मिरवणूक काढत भावपूर्ण वातावरणात गिरगाव, जुहू, दादर सारख्या चौपाटीवर आणि कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आले.

यावेळी, गणेश भक्तांना कोरोना नियमांचा जणू विसरच पडला होता. मात्र मुंबई महापालिका, बेस्ट, पोलीस, अग्निशमन दल, सामाजिक संस्था यांनी गणेश विसर्जनासाठी हाती घेतलेली जबाबदारी नीटपणे पार पाडली. त्यामुळे मुंबईत तरी दीड दिवसांच्या गणेश विसर्जनाला कुठेही गालबोट लागल्याचे, अथवा मोठी दखल घेण्यासारखे अप्रिय वृत्त सायंकाळी उशिरापर्यन्त तरी हाती आले नाही.

- Advertisement -

मुंबईत श्रीगणेश चतुर्थीला काही ठिकाणी छोट्या, मोठ्या खड्ड्यांच्या अडथळ्यांवर मात करीत विघ्नहर्ता श्रीगणेशाचे धुमधडाक्यात, वाजतगाजत मिरवणूक काढत आगमन झाले. दीड दिवस गणेश भक्तांच्या घरी, सोसायटीत विराजमान झाल्यावर गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत एकूण ३४,०७० गणेशमूर्तींचे आणि ५२ हरतालिकांचे नैसर्गिक व कृत्रिम तलाव या विसर्जन स्थळी उत्साहात विसर्जन करण्यात आले. यामध्ये, नैसर्गिक विसर्जन स्थळी ५४ सार्वजनिक गणेशमूर्ती व २०,६६८ घरगुती गणेशमूर्तींचे, असे एकूण २०,७२२ गणेशमूर्तींचे आणि ३८ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले.

तसेच, एकूण विसर्जनात कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती व हरतालिकांचाही समावेश आहे. पालिकेने यंदा १५२ कृत्रिम तलाव बनवले आहेत. या कृत्रिम तलावांत ५४ सार्वजनिक गणेशमूर्तींचे तर १३,२९४ घरगुती गणेशमूर्तींचे, असे एकूण १३,३४८ गणेशमूर्तींचे आणि १४ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने श्रीगणेशोत्सवासाठी दोन महिने अगोदरपासून पूर्व तयारीला व विविध सेवासुविधा पुरविण्यासाठी सुरुवात केली होती. मुंबई शहर व उपनगरे येथे पालिकेच्या २४ विभागात गिरगाव, दादर, जुहू आदी समुद्र चौपाटी, खाडीच्या ठिकाणी आणि शीतल, पवई , सायन तलाव यांसारखे नैसर्गिक तलाव अशा ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि १५२ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेशमूर्ती व हरतालिकांच्या विसर्जनाची चांगली व्यवस्था केली आहे.

महापालिकेने, विसर्जन स्थळी निर्माल्य कलश, समुद्र, खाडीच्या ठिकाणी विसर्जन करताना कोणीही समुद्रात बुडू नये यासाठी जीवरक्षक, मोटार बोट, नियंत्रण कक्ष, मोबाईल टॉयलेट, निरीक्षण मनोरे, वैद्यकीय मदत, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका, काही ठिकाणी श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रे आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. उंच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी १५२ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, विसर्जन स्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


हेही वाचा : आपले आमदार सांभाळा नाहीतर.., दीपक केसरकरांचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -