घरताज्या घडामोडीशून्य फेरी नसल्यामुळे पहिल्या फेरीतील प्रवेश कमी होणार

शून्य फेरी नसल्यामुळे पहिल्या फेरीतील प्रवेश कमी होणार

Subscribe

अकरावी प्रवेश प्रक्रियेवर होणार परिणाम

अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान दरवर्षी कोट्यांतर्गत होणार्‍या प्रवेशांसाठी शून्य फेरी राबवण्यात येत असते, मात्र यंदा ही शून्य फेरी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कोट्यांतर्गत होणारे प्रवेश हे पहिल्या फेरीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. परिणामी पहिल्या फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना जागा अ‍ॅलॉट झाल्या तरी प्रवेश कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयसीएसई मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण संचालनालयाकडून अकरावी प्रवेशाचा भाग 2 भरण्यास सुरुवात करण्यात आली. अकरावी प्रवेश प्रक्रियेंतर्गत दरवर्षी इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा, अल्पसंख्याक कोटा अशा कोट्यांतर्गत प्रवेशासाठी शून्य फेरी राबवण्यात येते. या शून्य फेरीअंतर्गत दरवर्षी 30 ते 40 हजार प्रवेश होत असतात. त्यामुळे नियमित फेर्‍यांवर फारसा ताण येत नाही, मात्र यंदा शिक्षण संचालनालयाकडून ही शून्य फेरी रद्द करण्याचा निर्णय घेतला असून कोट्यांतर्गत होणारे प्रवेश हे पहिल्या नियमित फेरीसोबतच होणार आहेत. त्यामुळे कोट्यांतर्गत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या कोट्याच्या यादीमध्ये जागा अ‍ॅलॉट होईल, मात्र त्याचवेळी त्यांना नियमित प्रक्रियेतूनही जागा अ‍ॅलॉट होण्याची शक्यता आहे. परिणामी एका विद्यार्थ्याला इन हाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा आणि नियमित प्रक्रियेतून जागा अ‍ॅलॉट होतील. विविध ठिकाणी नाव आल्याने विद्यार्थी, पालकांबरोबरच कनिष्ठ महाविद्यालयांचाही गोंधळ उडण्याची शक्यता आहे. एकाच विद्यार्थ्याला 2 ते 3 जागा अ‍ॅलॉट झाल्याने त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होऊन पहिल्या फेरीतील प्रवेश कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

दरवर्षी शून्य फेरीमध्ये कोट्यांतर्गत 30 ते 40 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश होत असतात, मात्र यंदा नियमित फेरीमध्येच हे प्रवेश अंतर्भूत करण्यात आल्याने पहिल्या फेरीमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पहिल्या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना 2 ते 3 दिवस देण्यात येतात. या 3 दिवसांमध्ये साधारणपणे दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अपलोड करणे शक्य नाही. त्यामुळे पहिल्या फेरीत झालेले प्रवेश हे संकेतस्थळावर न दिसल्याने त्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या फेरीतही जागा अ‍ॅलॉट होऊन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातून वर्तवण्यात येत आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार?

- Advertisement -

केंद्रीय मंडळाचे निकाल जाहीर झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया राबवता येणार नसल्याचे शिक्षण संचालनालयाकडून यापूर्वी जाहीर करण्यात आले होते, मात्र आता सर्व मंडळांचे निकाल जाहीर होऊनही शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेचे पूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -