पुणे : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 14 ते 16 सप्टेंबर या काळात ही बैठक होणार आहे. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे ही तीन दिवसीय बैठक पार पडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उपस्थित राहणार आहेत. तसेच, संघामधील सुमारे 35 ते 40 संघटनांचे 250 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होतील, असेही सांगण्यात आले आहे. परंतु, अमित शहा आणि जे. पी. नड्डा हे दोघेही या बैठकीला पूर्ण वेळ उपस्थित राहणार असल्याने या बैठकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ( important meeting of Rashtriya Swayamsevak Sangh in Pune, Amit Shah, J. P. Nadda will be present)
हेही वाचा – “मराठा आरक्षणाचा निर्णय संसदेच्या विशेष अधिवेशनातच घ्यावा”, नाना पटोलेंची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील पानिपत जिल्ह्यात 12 ते 14 मार्च दरम्यान झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत समन्वय बैठकीची तारीख व स्थान निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पार पडणार आहे. मुख्य बैठक ही 14 ते 16 सप्टेंबरदरम्यान होणार असून या बैठकीच्या दोन दिवसआधी व त्यानंतर दोन दिवस विशेष अशा बैठकीचे आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे सभागृह, मैदानाची व्यवस्था, निवासव्यवस्थेच्या कामांना वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या बैठकीमध्ये 35 पेक्षा अधिक संघाच्या संस्थाचे प्रतिनिधी हजर असतात. या बैठकीत सरसंघचालक व सरकार्यवाहांच्या उपस्थितीत ज्या 35 पेक्षा अधिक संघटना या बैठकीला येतात, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष, महामंत्री (सरचिटणीस) उपस्थित असतात. हे प्रतिनिधी आपल्या संघटनांचा कार्यअहवाल सादर करतात. त्यानंतर साधकबाधक चर्चा होऊन पुढील कार्याची दिशा आणि परिवारातील संघटनांच्या समन्वयाची कार्यपद्धती निश्चित केली जाते. त्यामुळे संघाच्यादृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जाते.
या बैठकीला विशेष महत्त्व यासाठी आहे. कारण या बैठकीच्या एक दिवसानंतरच लगेच 18 तारखेला संसदेकडून विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर संघाकडून ही बैठक बोलविण्यात आली आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. परंतु, ही बैठक ज्यावेळी होणार आहे. त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पंरतु, याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी याबाबतची जोरदार चर्चा करण्यात येत आहे. तसेच, मोदी यांचा एक दिवसीय दौरा झाला तरी ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.