धक्कादायक: कोरोनामुक्त महिलेला पुन्हा कोरोनाची लागण, देशातली पहिली केस

देशात कोरोनामुक्त झालेला रूग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहरात राहणाऱ्या एका महिलेला ४ महिन्यांनी पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुक्त झालेला रूग्ण पुन्हा बाधित होण्याचे देशातील हे पहिलेच प्रकरण आहे. आजतक ने याबाबत वृत्त दिले आहे.

अहमदाबाद येथील ५४ वर्षीय महिलेला पहिल्यांदा १८ एप्रिलला कोरोनाची बाधा झाली होती. यानंतर तिला कोविड रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर महिला कोरोनामुक्त झाली आणि तिला डिस्चार्ज देखील देण्यात आला. मात्र आता १२४ दिवसांनी हीच महिला पुन्हा पॉझिटिव्ह आढळली आहे. देशातील हे पहिलेच प्रकरण आहे. महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा मुलगा एअरफोर्समध्ये आहे. काही दिवसांपूर्वी तो पत्नी आणि ३ वर्षांच्या मुलासह दिल्लीवरून अहमदाबादला आईकडे आला होता. यानंतर महिला आणि तिच्या मुलाला ताप आल्याने चाचणी करण्यात आली. यात दोघेही पॉझिटिव्ह आढळले. मुलाला अहमदाबाद येथील डिफेन्स रूग्णालयात, तर आईला कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले.

कोविड रूग्णालयाचे डॉक्टर प्रज्ञेश वोरा यांनी याबाबत सांगितले की, महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वाब पुन्हा घेण्यात आला असून संशोधनासाठी पुण्यातील व्हायरलॉजी लॅबला पाठवण्यात आला. तसेच आयसीएमआरला देखील याबाबत कळवण्यात आले आहे.


हे ही वाचा – सार्वजनिक, मालवाहतूक वाहनांना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर पर्यंत करमाफी!