Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Barsu Refinery : बारसू गावात ठाकरे गट आणि महायुती येणार समोरासमोर

Barsu Refinery : बारसू गावात ठाकरे गट आणि महायुती येणार समोरासमोर

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बारसू सोलगावातील लोकांची शनिवारी भेट घेणार आहेत. पण याच दिवशी आता शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप म्हणजेच महायुतीकडून बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनात मोर्चा काढण्यात येणार आहे.

रत्नागिरी : कोकणातील नाणार येथे उभा करण्यात येणारा रिफायनरी प्रकल्प आता राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव येथे उभा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण या निर्णयाला गावातील ग्रामस्थांनी विरोध करत तीव्र आंदोलन केले. दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला. एकीकडे सत्ताधारी हा प्रकल्प या गावात व्हावा, यासाठी आग्रही असताना दुसरीकडे राज्यातील विरोधकांनी म्हणजेच ठाकरे गटाने गावकऱ्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. (In Barsu village, Thackeray group and Maha Uti will come face to face)

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) हे बारसू सोलगावातील लोकांची शनिवारी (ता. 06 मे) भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या दौऱ्याचे नियोजन केले होते. पण याच दिवशी आता शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप म्हणजेच महायुतीकडून बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनात मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्यामुळे आता हे दोन्ही विरोधक एकमेकांच्या समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या समर्थन मोर्चाच्या माध्यमातून ठाकरेंच्या समोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

- Advertisement -

या समर्थन मोर्चाची माहिती भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार हे रिफायनरीच्या समर्थनात निघाणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. कोकणाच्या विकासासाठी, रोजगारासाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून मांडली आहे. हा मोर्चा रत्नागिरी हेलिपॅडपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरे देखील याच ठिकाणी उतरणार असल्याने याच ठिकाणाहून हा समर्थन मोर्चा काढला जाणार असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही कट्टर विरोधक एकमेकांच्या समोर येणार असल्याने त्यावेळी नेमके काय घडते? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे शनिवारी पहिल्यांदा बारसू गावातील आंदोलकांची भेट घेतील. या ठिकाणी रिफायनरीला समर्थन देणारी काही लोक ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याकडे संमतीपत्र देणार आहेत. तसेच, यावेळी राजापुरातील विविध 51 संघटना, ग्रामपंचायतीचे सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो समर्थक उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -