नागपुरात भाजप भुईसपाट, नागो गाणारांची हॅटट्रिक हुकली; मविआचा दणदणीत विजय

BJP Lost in Nagpur Teacher Constitution | भाजपाच्याच बालेकिल्ल्यात भाजपाचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जल्लोष केला असून देश जिंकून देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आपला मतदारसंघ राखता आला नाही, अशी टोलेबाजीही सुरू झाली आहे.

nagpur teacher constitution

BJP Lost in Nagpur Teacher Constitution | नागपूर – २२ उमेदवारांना धोबीपछाड करत महाविकास आघाडीच्या सुधाकर अडबाले यांनी विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघात १६ हजार ५०० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाच्याच बालेकिल्ल्यात भाजपाचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जल्लोष केला असून देश जिंकून देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आपला मतदारसंघ राखता आला नाही, अशी टोलेबाजीही सुरू झाली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून अजय भोयर यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, ऐनवेळी भोयर यांना डावलून नागो गाणार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अजय भोयर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडून सुधाकर अडबाले यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नागो गाणार यांना भाजपाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपाचे नागो गाणार आणि मविआचे सुधाकर अडबाले यांच्यात खरी लढत झाली.

हेही वाचा – नाराजी नाट्यानंतरही मराठवाड्यात मविआने गड राखला, भाजपाला ‘अपक्ष’कडूनही धोबीपछाड

महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे प्रारंभापासून आघाडीवर होते. दुसरीकडे अपक्ष उमेदवार अजय भोयर यांनाही लक्षणीय मते मिळाली होती. दोन टर्म या मतदारसंघातून आमदार राहिलेले नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले या तिघांत थेट लढत राहिल असे चित्र होते. मात्र, प्रत्यक्षात अडबाले व गाणार यांच्यातच लढत असल्याचे दिसून आले. अजय भोयर यांच्यामुळे नागो गाणार यांना मिळणाऱ्या मतांमध्ये विभाजन झालं असं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.

या निवडणुकीत शिक्षक भारती, शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, वंचित बहुजन आघाडीने उमेदवार रिंगणात होते. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडीचे दीपराज खोब्रागडे हे दखलपात्र उमेदवार होते. राष्ट्रवादीचे सतीश ईटकेलवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कयम ठेवली. मात्र, बंडखोरी केल्याबद्दल ईटकेलवार यांना पक्षातून निलंबित केले होते. या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे डॉ. देवेंद्र वानखेडेही रिंगणात होते.

हेही वाचा – कोकणात शेकापचा बालेकिल्ला ढासळला, भाजपाचं कमळ फुललं; बाळाराम पाटील यांचा पराभव

भाजपाची नाचक्की

या मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपाची सत्ता होती. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना भाजपाने पाठिंबा दर्शवला होता. त्यांच्या विजयासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचारफेऱ्या घेतल्या होत्या. मात्र, तरीही भाजपाला येथे सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपाची खिल्ली उडवली जात आहे.