नागपूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, नवेगाव खैरी धरणाचे उघडले १६ दरवाजे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरात वाहून गेल्यामुळे २ दिवसांत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ३०० हून अधिक घरांचं नुकसान झालंय. नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांद धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय गोसीखुर्दमधील बॅक वॅाटरमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुरामुळे अद्याप कुणालाही दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलेलं नाहीये. येथील यंत्रणा सुद्धा तैनात करण्यात आल्याची माहिती नागपुरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नागपुरात पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उमरेड तालुक्यातील वडगाव धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

काही गावांमध्ये पुराचा धोका उद्भावण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शाळांना सुट्टी देता येईल का?, यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसोबत चर्चा करण्यात आली. जी घरं पुरात वाहून गेली त्यांच्या कुटुंबियांना चार लाखांपर्यंत शासनाकडून मदत दिली जाते. याशिवाय गरजूंना सेवा सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी विमला यांनी सांगितलं.

गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ५१०.३० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती पाहता जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मन्याड, पैनगंगा, मांजरा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.