Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी नाशिक जिल्ह्यात महिनाभर पुरेल इतकाच चारा, जनावरांचाही प्रश्न गंभीर होणार

नाशिक जिल्ह्यात महिनाभर पुरेल इतकाच चारा, जनावरांचाही प्रश्न गंभीर होणार

Subscribe

नाशिक : नाशिक जिल्हयात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असतांना आता जनावरांचया चारयाचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या तरी सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक असून वन विभाग क्षेत्रावरील उपलब्ध चारयाचा विचार करता चार महिने हा चारा पुरू शकेल. त्यामुळे जंगलांसह इतरत्र उपलब्ध गवत, चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास लवकरच बंदी घातली जाणार आहे.

पावसाअभावी अनेक भागात पिके करपली असून चार्‍याची टंचाई भेडसावणार आहे. जिल्ह्यात एकूण ११ लाख १६ हजार २८४ जनावरे आहेत. यात आठ लाख ९२ हजार ६०४ मोठी तर दोन लाख २३ हजार ६८० लहान जनावरांचा समावेश आहे. या जनावरांसाठी प्रत्येक महिन्याला एक लाख ८० हजार ८०० मेट्रिक टन चार्‍याची आवश्यकता भासते. सध्या तरी सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल इतकाच साठा शिल्लक असला तरी सध्या वन विभागासह इतरत्र मिळून आठ लाख ५२ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. पुढील चार महिने तो पशूधनाची गरज भागवू शकेल.

- Advertisement -

पुढील काळात चारा उपलब्ध होण्यासाठी ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी चारा लागवड करण्याची सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी केली आहे. अशा भागातील शेतकर्‍यांना दीड हजार रुपयांच्या मर्यादेत बियाणे देऊन चारा लागवड करण्यात येईल. नंतर हा चारा शासन खरेदी करणार आहे. जिल्ह्यातील वन विभागाच्या क्षेत्रावरील ५७ हजार ११४ मेट्रिक टन चार्‍यासह अन्य ठिकाणचा चारा जिल्ह्याबाहेर जाऊ नये म्हणून वाहतुकीवर निर्बंध घातले जाणार आहेत. या बाबतचे आदेश लवकरच निघणार असल्याचे सांगितले जाते.

पालघर, विक्रमगडहून आणणार चारा

चारा टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत पशुपालकांना चारा लागवडीसाठी वैरण पिकांचे बियाणे उपलब्ध करण्यासाठी अर्थात अतिरिक्त चारा उत्पादनासाठी एक कोटींची तरतुदीची मागणी करण्यात आली आहे. यातून तीन लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. वन विभाग, वन विकास महामंडळ, आदिवासी विकास विभाग यांच्याकडील चारा राखीव केला जाईल. वैरण विकास योजनेसाठी निधी उपलब्ध करणे, कडबाकुट्टी यंत्र खरेदी, मूरघासासाठी पिशव्या, गाळपेरा क्षेत्रात वैरण बियाण्यांची लागवड अशा उपाययोजना सुचविल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर, गरज भासल्यास जिल्हा नियोजनच्या निधीतून पालघर व विक्रमगड येथील डोंगर माथ्यावरील चार्‍याचे भारे खरेदी करण्याचा विचार आहे. पशुसंवर्धन विभागाने राज्यस्तरावर चार्‍यासाठी एक लाख ३२ हजार किलो बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. यातील ३२ हजार किलो बियाणे अद्याप मिळणे बाकी आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -