घरमहाराष्ट्र'शिवगर्जने'ला आशीर्वाद यात्रेतून उत्तर, महायुती मुंबई पिंजून काढणार

‘शिवगर्जने’ला आशीर्वाद यात्रेतून उत्तर, महायुती मुंबई पिंजून काढणार

Subscribe

मुंबई – शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)कडून शिवगर्जना यात्रेला सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवर पक्षसंघटना वाढवण्याकरता संजय राऊत, सुषमा अंधारेंसह अनेकजण फिल्डवर उतरले आहेत. आता भाजापनेही लोकसभेच्या तयारीला सुरुवात केली असून भाजपा-शिवसेना (शिंदे गट) महायुतीकडून रविवारपासून मुंबईतील सहा जिल्ह्यांत आशीर्वाद यात्रा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून याच अनुषंगाने भाजपा आणि शिवसेना यांच्यावतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा रविवारी (ता. ५) मार्चपासून सुरू होत आहे. दीड दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अशा सहा यात्रा संपन्न होतील अशी माहिती भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, ५ मार्च, ९ आणि ११ मार्च रोजी प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा होईल. त्यानंतर १४ मार्चला दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्य होईल असेही ते म्हणाले.

या महानाट्याच्या विनामूल्य प्रवेशिका मुंबईतील दादर शिवाजी मंदिर, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली, दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले, कालिदास नाट्यगृह मुलुंड आणि दामोदर नाट्यगृह परेल आदी ठिकाणी 9 मार्चपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रोज सुमारे 10 हजार प्रेक्षकांना हे महानाट्य पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मालिकेचे शिर्षक प्रायोजक ‘सुगी’ हे नामवंत विकासक आहेत, तर भारतीय स्टेट बॅंक हे सह-शिर्षक प्रायोजक आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे पाच मजली भव्य रंगमंचावरील हे ऐतिहासिक महानाट्य असून याची फिरता रंगमंच हे त्याचे खास आकर्षण आहे. तसेच आकर्षक प्रकाश योजना, याशिवाय, घोडे, बैलगाड्यांचा समावेश असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -