नाशिक : भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या विहिरीत पडल्याची सुरगाणा तालुक्यातील उंबरठा येथे घडली. उंबरठा वनपरिक्षेत्रातील काठीपाडा येथील शेतकरी सिताराम दहावाड यांच्या मालकीच्या विहीरीतून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षाचे आहे.
उंबरठा गावालगतच्या शेतात विहीर आहे. रात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या विहरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. विहीर अगदी गावालगतच असल्याने रात्रीच्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ गावालगत येत असतात. सर्वत्र झाडे, झुडपे, लता वेलींनी सर्वच गावालगतचा परिसर हिरवागार होऊन दाट झाडी तयार झाली आहे. रात्रीच्या अंधारात घरातील मांजरे रान उंदराच्या शिकारीसाठी जंगलात जातात. मांजराचा पाठलाग करण्याच्या नादात मांजराने’चकवा’ दिला असावा त्यामुळे बिबट्या विहरीत पडला असेल असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
नेहमीप्रमाणे काही महिला विहरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या असता त्यांच्या हि बाब लक्षात आल्याने ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला कळविण्यात आले. विहिरीत पाईप असल्याने त्याचा आधार घेऊन बिबट्याने रात्रभर तग धरली असावी. सकाळी काही नागरिकांनी लोखंडी विणलेली खाट उलटी बांधून त्यावर बिबट्याला बसायची व्यवस्था केली होती.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक उमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर तसेच वनरक्षक तुकाराम चौधरी, अरुण मेघा, भटू बागुल, योगेश गांगुर्डे, याशिनाथ बहिरम, भास्कर चव्हाण, वामन पवार, कल्पना पवार, अविनाश छगणे, रामजी कुवर, हिरामण थवेल, यमुना बागुल व नाशिक येथील वन्यप्राणी बचाव सहाय्यक पथक आदींनी गावकर्यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला दुपारी बारा वाजेच्या सुमारास विहिरीतून सुरक्षित बाहेर काढून उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात सुरक्षित नेण्यात आले.