घरउत्तर महाराष्ट्रऐन उन्हाळ्यात विजा अन् अवकाळीचा तडाखा; शेतकरी धास्तावला

ऐन उन्हाळ्यात विजा अन् अवकाळीचा तडाखा; शेतकरी धास्तावला

Subscribe

नाशिक : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासूनच हवामान ढगाळ होते. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात ९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या बेमोसमी पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळवले असून, अवकाळी पावसामुळे शेतीपिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १८ मार्चदरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तर तामीळनाडू ते कोकणपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. पश्चिम बंगाल ते ओडिशादरम्यान आणखी एक असा पट्टा आहे. मध्य राजस्थान व परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वार्‍याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून वाहणार्‍या वार्‍यांमुळे तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

- Advertisement -

बुधवारी (दि.१५) मध्यरात्री शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत मुसळधार पावसाला सुरूवात झाली. गेल्याच आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरणात पुन्हा बदल झाल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या निफाड तालुक्यातील द्राक्षउत्पादकांची चिंता वाढली आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जातो की काय, अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील पश्चिम भागातील सायखेडा चांदोरीसह परिसरातील गावांना फटका बसला होता. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे ४० ते ५० रुपये किलो मिळणारे बाजारभाव अक्षरशः उत्पादन खर्च निघणार नाही, असा १५ ते २० रुपयांपर्यंत कोसळल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाह करावे कसे, घेतलेले कर्ज फेडावे कसे, असा यक्षप्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना पडला आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्हा हा कांदा, द्राक्ष, भाजीपाला, डाळिंब, गहू अशा पिकांसाठी प्रसिद्ध आहे. हीच पिके अवकाळीमुळे धोक्यात आली होती. त्यातून काहीअंशी शेतमाल शेतकर्‍यांच्या हाती लागला. त्यामुळे दोन पैशांचा फायदा होईल अशी स्थिती असताना उत्पादन खर्चही निघणार नाही, अशी स्थिती घसरत्या बाजारभावामुळे निर्माण झाली. अशातच पुन्हा हवामान विभागाने शेतकर्‍यांना धक्का देणारी बातमी दिली. त्यात 13 तारखेपासून ते 1८ तारखेपर्यंत अवकाळी पाऊस हा वादळी वार्‍यासह येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचनुसार राज्यात हवामान बदल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -