घरठाणेहुश्श, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पोलिसांनी वेळीच रोखला बालविवाह!

हुश्श, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पोलिसांनी वेळीच रोखला बालविवाह!

Subscribe

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातील कळवा- खारेगाव येथील एका झोपडपट्टीत बालविवाह सोहळा होणार होता. पण ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने बुधवारी वेळीच हालचाल करून हा विवाह रोखला. यावेळी दोन्ही अल्पवयीन मुलांसह नातेवाईकांची वरात मंडपातून थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली. अंगाला हळद लागल्यानंतर लग्नाची तयारी सुरू असतानाच बाल विवाह रोखण्यात ठाणे शहर पोलीस एका सामाजिक संस्थेच्या मदतीने यश आले आहे.

‘सलाम बालक चाईल्ड-लाइन’ संस्थेच्या श्रद्धा नारकर यांनी कळवा खारेगाव येथील शांतीनगर झोपडपट्टी बालविवाह सोहळा पार पडत असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांना दिली. तसेच बालसंरक्षण पथकातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व महिला पोलीस अमलदार तसेच कळवा पोलिसांसह स्वत: श्रद्धा नारकर मंडपात दाखल झाल्या. त्यावेळी हळदीचा कार्यक्रम उरकला होता आणि लग्नाची पुढील तयारी सुरू झाली होती, पोलिसांना मंडपात पाहून सर्वच हैराण झाले.

- Advertisement -

पोलिसांनी त्या 19 वर्षीय मुलासह 16 वर्षीय मुलीला आणि त्यांच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी त्या दोघांच्या नातेवाईकांना बालविवाह न करण्याबाबत सूचना दिल्या आणि हा विवाह न करण्याबाबत त्यांचे मनपरिवर्तन केले आहे. तसेच त्या दोघांच्या नातेवाईकांकडून हा विवाह पुढे ढकलण्यात आल्याचे बंधपत्र लिहून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

असे म्हटले जाते की, घटनास्थळी पोलीस उशिरा पोहोचतात. पण या बालविवाह सोहळ्यात वेळीच मंडपात दाखल झाल्याने ठाणे शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कामगिरी ठाणे शहर गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, पोलीस उपनिरीक्षक शंकर जाधव, पोलीस हवालदार एस. आर. साळवी, एच. एम. तळेकर, एस. टी. चौधरी, पोलीस नाईक टी. जी. शिरसाठ, पोलीस शिपाई एस. व्ही. दोंदे, एस. डी. कांबळे तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक वेंगुर्लेकर या पथकाने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -