भिवंडीत पकडला एक कोटी 9 लाखांचा तंबाखूजन्य पदार्थ

गेल्या दीड वर्षात कोकणातून सात कोटी ३४ लाखांहून अधिकचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त

FDA Office

ठाणे । गुटखा किंवा तंबाखू जन्य पदार्थांच्या विक्री करण्याबरोबर त्याचा साठा करण्यास बंदी असताना, त्याची बेकायदेशीररित्या ठाणे आणि मुंबईत विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या ट्रकवर ठाणे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए ) मंगळवारी सायंकाळी कारवाई करत, सुमारे एक कोटी 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी ट्रक मालकासह चालक अशा सहा जणांविरुद्ध भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, प्रतिबंधित अन्नपदार्थाचे वाहतूक केल्याप्रकरणी त्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच वाहन चालकाचा वाहन परवाना रद्द केल्याची कारवाई व्हावी यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती ठाणे एफडीएने दिली.

याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात ट्रक चालक परमेश्वर ढाकरगे याच्यासह वाहनाचे मालक, राजेश राजु शेटीया, राजकुमार सपाटे, शौकत अली पठाण व राजेश गुप्ता अशा सहा जणांविरुद्ध बुधवारी 23 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांच्या आदेशाने तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे आणि कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

राज्यात गुटखा आणि तंबाखू जन्य पदार्थ विक्रीस तसेच त्याचा साठा करणे किंवा त्याची वाहतूक करण्यास २०१२ पासून महाराष्ट्र राज्यात बंदी आहे. तरीसुद्धा चोरट्या मार्गे त्याची वाहतूक करणे तसेच विक्री केली जात असल्याचे वारंवार उघडकीस येत आहेत. अशांवर ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने ठाणे,पालघर, रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात कडीनजर ठेवत, त्यांच्या कारवाईचा बडगा नेहमीच उगारला जात आहे. तर गेल्या आणि या वर्षात म्हणजे दीड वर्षात  केलेय कारवाईत २४२ ठिकाणाहून सात कोटी ३४ लाख १९ हजार ६२४ रुपयांचा एकूण साठा जप्त केला आहे. तर तब्बल १११ प्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केले आहेत. तसेच गतवर्षातील ३१ खटले न्यायालयात दाखल असल्याची माहिती ठाणे एफडीएने दिली.

ठाणे एफडीएने कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात
०१ एप्रिल ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत एकूण १०५ धाडी टाकून तपासणी केली. त्यामध्ये ९९ ठिकाणीहुन सुमारे रुपये ४ कोटी ५३ लाख १४ हजार ६१८ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केला. तसेच या प्रकरणी संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलीस ठाण्यात एकूण ५२ एफआयआर दाखल केले.प्रतिबंधित अन्नपदार्थाची व्यवसाय प्रकरण ८६ अन्न आस्थापना व २० वाहने सील करण्यात आलेली आहेत. तर या प्रकरणी एकूण ३१ खटले न्यायालयात दाखल केल्याची माहिती एफडीएने दिली. तसेच यावर्षी म्हणजे ०१ एप्रिल ते २२ नोव्हेंबर २०२२ दरम्यान कोकण विभागातील त्या पाच जिल्ह्यातील १७४ आस्थापनांची तपासणी केल्यावर १४३ ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थाचा सुमारे दोन कोटी ८१ लाख ०५ हजार ६ रुपयांचा साठा जप्त केला आहे. तसेच संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलीस ठाण्यामध्ये एकूण ५९ एफआयआर केले आहेत. तर १२९ आस्थापना व दोन वाहने प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या व्यवसाय करतात म्हणून सील करून ताब्यात घेतल्याची माहिती कोकण विभागाचे सह- आयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.